परवानगी न घेता नियमित बी.एड करणाऱ्या शिक्षकांवर तत्कालीन शिक्षणाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वाघमारे यांनी कारवाई केली होती. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी ही कारवाई भ्रष्ट मार्गाने दाबली. प्राथमिक शिक्षण अधिकारी नितीन उपासनी मागासवर्गीय शिक्षकांना हेतूत: त्रास देतात, अशी तक्रार बाबू गणेश जाधव या शिक्षकाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तसेच शिक्षकांच्या बदल्यांमध्ये नियमबाह्य़ संचिका सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
शिक्षक बदल्यांच्या वेळी औरंगाबाद तालुक्यातील टाकळी वैद्य, लायगाव, दुधड येथील प्राथमिक शाळांमधील रिक्त जागा दडविण्यात आल्या. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन थेट नियमबाह्य़पणे नियुक्तया दिल्याचा आरोप या समितीने केला आहे. सिल्लोड येथील निलंबित शिक्षक आर. बी. पाटील यांना पुनस्र्थापना देण्याचे आदेश दीड महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ते आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू न देता, आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रकारात शिक्षण विभागातील कारकून व शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी गैरव्यवहार केला असल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 1:48 am