देशातील सध्याची परिस्थिती वाईट असताना प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था सक्रिय असल्यामुळे लोकशाही टिकून आहे. समाजातील या दोन्ही घटकांनी निर्भीडपणे काम केले तर अनेक प्रश्न सुटू शकतात, अशी आशा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी व्यक्त केली.
 बीड येथील शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण जिल्हा परिषद सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, मानवी हक्कचे अध्यक्ष अॅड. एकनाथ आवाड, पत्रकार संघाचे संतोष मानूरकर, महेश वाघमारे, प्रतिष्ठानचे अक्षय केंडे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी ग. वा. बेहरे पत्रकारिता पुरस्कार पत्रकार विजय बहादुरे यांना, हृदयश्री पुरस्कार डॉ. दिवाकर गोळजकर, एकनिष्ठ कार्यकर्ता पुरस्कार पी. एस. घाडगे आणि चित्रपती पुरस्कार सुहास पालिमकर यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी डॉ. अशोक कोल्हे म्हणाले, प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्थांनी निर्भीडपणे कार्य केले तर समाज आणि देशासमोरील प्रश्न सुटू शकतात. या वेळी अॅड. एकनाथ आवाड यांचेही भाषण झाले. ते म्हणाले, समाजात अनेक व्यक्ती प्रामाणिकपणे आपले कार्य पार पाडतात. अशा लोकांचे कार्यच समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावते. या कामांना प्रोत्साहन दिले तर ते अधिक चांगले काम करू शकतात. त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप महत्त्वाची असल्याचे सांगितले.