अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडा (खालसा) येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने नवी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंद शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अहमदनगर जिल्हय़ातील जवखेडा खालसा एकाच दलित कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या मानवतावादी विचारांना काळिमा फासणारी असून या घटनेचा निषेध करत रिपाइंच्या वतीने शुक्रवारी नवी मुंबईत बंद पुकारला. गुरुवारी रात्री बंदची हाक दिल्यांनतर शुक्रवारी सकाळपासून दिघा, कोपरखरणे, ऐरोली, रबाले, तुभ्रे आणि नेरुळच्या परिसरात व्यापऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध केला.
महाराष्ट्रात दलितांवर होणारा अन्याय दूर व्हावा, दलित महिलांची होणारी पिळवणूक थांबवावी, अॅट्रॉसिटीच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशा मागण्यादेखील या वेळी रिपाइंने करत नगर जिल्हय़ातील दलित कुटुंबातील हत्येतील सहभागी आरोपींना सरकारने कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
रिपाइंच्या वतीने अनेक ठिकाणी घटनेचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. साठेनगर, ईश्वरनगर, रबाले आंबेडकर नगर येथील बुद्धविहारात शांतीचा संदेश देत या घटनेचा निषेध करण्यात आला.