टोलविरोधातील महामोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी शिरोली नाक्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात छत्रपती शाहूमहाराज, खासदार सदाशिवराव मंडलिक, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पुढारीकार प्रतापसिंह जाधव, आमदार चंद्रदीप नरके, कॉ. गोविंद पानसरे, धनंजय महाडिक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जोरदार घोषणाबाजी करीत सुमारे तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.    
    कोल्हापूरमध्ये शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत २२० कोटी रुपयांचे सुमारे ५० किलोमीटर अंतराचे रस्त्यांचे काम झाले आहे. बांधा, वापरा व हस्तांतर करा या तत्त्वावर हे काम झाले असून, त्यावर आयआरबी कंपनी ३० वर्षे टोल वसूल करणार आहे. या वसुलीला शहरातील नागरिकांचा जोरदार विरोध आहे.
 हा विरोध नोंदविण्यासाठी सातत्याने आंदोलने होत आहेत. गतवर्षी ९ जानेवारी रोजी राज्य शासनाला नागरिकांच्या भावना समजाव्यात यासाठी महामोर्चा काढला होता. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने चर्चाही केली. मात्र राज्य शासन टोल रद्द करण्याबाबत दिरंगाई व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. याच्या निषेधार्थ आज शिरोली नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.    
    दुपारी झालेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, नागरिक, महिला, युवक, कृती समितीचे कार्यकर्ते यांचा जोरदार पाठिंबा मिळाला. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शिरोली नाका येथे नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. तेथेच धरणे आंदोलन सुरू झाले. या वेळी एन. डी. पाटील, खासदार मंडलिक, प्रतापसिंह जाधव, कॉ.गोविंद पानसरे यांची भाषणे झाली.    
    कोल्हापूरकरांची जाणीवपूर्वक कळ काढाल, तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा एन. डी. पाटील यांनी दिला. खासदार मंडलिक यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांकडे टोलप्रश्नी नागरिकांची भूमिका मांडत आलो आहे. पण ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. केवळ टोलच नव्हे तर थेट पाणी योजना, विमान प्रवास, महालक्ष्मी मंदिर अशा अनेक महत्त्वाच्या विषयांच्या बाबतीत कोल्हापूरकरांची फसवणूक चालविली आहे.
या आंदोलनाची दखल प्रशासनाने गंभीरपणे घेतली होती. टोल नाक्याची मोडतोड होण्याच्या शक्यतेने नाक्याजवळ प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस काळजीपूर्वक प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवत होते. तासभर आंदोलन सुरू राहिल्याने कोल्हापूर शहरात प्रवेश करणारी तसेच शहरातून बाहेर जाणारी सर्व प्रकारची वाहने रस्त्यातच खोळंबली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. आंदोलनात कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन, ट्रकमालक संघटना, प्रवासी व माल वाहतूकदार संघटना यांच्यासह कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, महेश जाधव आदींचा समावेश होता.