चाळीस वर्षे रखडलेला कोल्हापूर महापालिकेचा हद्दवाढीचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावावा या मागणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी विधान भवनात निदर्शने केली. राज्यकर्त्यांनो, डोळय़ांवरचा चष्मा काढताय काय? हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावताय काय? अशा आशयाचा शासनाचा निषेधाचा फलक घेऊन त्यांनी ही निदर्शने केली.     
राज्यातील लहान क्षेत्रफळात मोडणारी कोल्हापूर महापालिका आहे. शहरात नगरपालिका असताना व त्या वेळची लोकसंख्या लक्षात घेता विकासकामांमध्ये अडथळा येत नव्हता. कालपरत्वे कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ होऊन उपनगरांची संख्याही वाढली आहे. तथापि आजही कोल्हापूर महापालिका शाहूकालीन व्यवस्थेच्या आधारावरच अवलंबून राहात असल्याने विकासकामांची स्थिती व शहराचा विकास अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे.महापालिकेची हद्दवाढ व्हावी यासाठी १९६७ पासून नगरसेवक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. आजही हा प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे. हद्दवाढ केल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याने कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हा निर्णय तातडीने शासनाने घ्यावा, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.
सीपीआरप्रश्नी ३० जुलैला बैठक
    कोल्हापूरसह कोकणातील गरीब रुग्णांना आधार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील समस्यांबाबत आढावा घेण्यासाठी ३० जुलै रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना या बैठकीचे आयोजन केले असल्याचे मंत्री गावित यांनी सांगितले. बैठकीस पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर,आमदार सा. रे. पाटील, आमदार विनय कोरे, आमदार के. पी. पाटील उपस्थित राहणार आहेत.