गोदावरी पाटपाणी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानी मोर्चा काढून पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन दिले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी हे निवेदन स्वीकारले. या आंदोलकांनी पुढे संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व अकोले येथे आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानीही मोर्चा नेला.    
गोदावरी पाटपाणी संघर्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅलीद्वारे विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानावर मोर्चा आणला होता. दोनशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. आण्णासाहेब म्हस्के पाटील, शालिनीताई विखे पाटील, उपसभापती सुभाष विखे, उपसरपंच अनिल विखे, शांतीनाथ आहेर आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी संघर्ष समितीचे राजेंद्र बावके यांनी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या दडपणाखाली अन्यायकारक कायदा केला. त्यामुळे पिके जळून जात असताना, औरंगाबाद येथील एमआयडीसीत असलेल्या कारखान्यांना १ लिटर दारु निर्माण करण्यासाठी २७ लिटर पाण्याचा अपव्यय केला जातो, असे सांगून जायकवाडीत सोडण्यात येणारे पाणी ताबडतोब थांबवावे, गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाला तातडीने निधी मिळून ही कामे व्हावीत, गोदावरी कालवा पाटपाणी समितीची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे अन्यथा आम्ही स्वत: कालव्यामधील वाढलेल्या काटय़ा काढून महाराष्ट्र शासन भिकारडे असल्याचे दाखवून देऊ आदी मागण्यांचे निवेदन या वेळी दिले.
अण्णासाहेब म्हस्के व श्रीमती शालिनीताई विखे यांनी संघर्ष समितीच्या भावनांशी सहमती दर्शवली. सरकारने जायकवाडीत पाणी सोडण्याचा विश्वसघातकी निर्णय घेतला असून, हा निर्णय येथील शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणारा असा आहे, असे ते म्हणाले.