अहमदनगर जिल्हयातील दलित कुटूंबांच्या हत्याकांडातील मारेकऱ्याचा अद्यापही शोध लागत नसल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीने मोर्चा, निदर्शने आणि रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. संशयितांना त्वरीत अटक करून कठोर शासन करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अंगावर शहारा आणणारे हत्याकांड घडून १० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप पोलीस तसेच प्रशासनाच्या हाती कोणतेच धागेदोरे लागलेले नाहीत. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अद्याप आंबेडकरी जनता संयम बाळगून असून याची पोलीस तसेच प्रशासनाने दखल घ्यावी. त्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय बागूल यांनी केले आहे. मोर्चेकऱ्यांनी काही मागण्या केल्या. त्यात जाधव कुटूंबाच्या हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा, हत्याकांडातील मारेकऱ्यांचा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कसून शोध घेण्यात यावा, हत्याकांडाचा खटला हा नगर जिल्हाबाहेर जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, जवखेडय़ातील स्थानिक पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांची त्रयस्थ तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, जाधव कुटूंबियांच्या उर्वरीत सदस्यांना संरक्षण देऊन पुनर्वसन करण्यात यावे, दलित अत्याचारांचे खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चा सीबीएसमार्गे शालिमारहून अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आला असता मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चात विजय बागूल, कृष्णा शिलावट, रवी चौरे, अंजली जाधव, प्रा. निकीता मोरे, ज्योती अटकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
nsk05
नांदगावमध्ये ‘धिक्कार मोर्चा’
अत्याचार विरोधी कृती समिती नांदगाव तालुक्याया वतीने जवखेडा येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ धिक्कार मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. याप्रसंगी मनोज काकळीज यांनी प्रास्तविक केले. अशोक जगताप, महिला आघाडीच्या निर्मलाताई केदारे, अनिल कोतकर, लिलाबाई काकळीज, अ‍ॅड. जयश्री दौंड, संतोष गुप्ता आदींची भाषणे झाली. अहमदनगर जिल्हा साखर सम्राट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट अशी ख्याती घेऊन मिरवितो. परंतु या जिल्ह्यात दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. शिवाय प्रशासनाचा मस्तावालपणा देखील या घटनेस कारणीभूत आहे. या घटनेतील संशयितांना तत्काळ अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
इगतपुरीमध्ये निदर्शने
नगर जिल्ह्य़ातील दलित हत्याकांडातील नराधमांना पकडण्यात अपयश आले असल्याच्या निषेधार्थ अखिल ग्रामीण इगतपुरी तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इगतपुरी येथे मोर्चा काढण्यात येऊन निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे नेते शशी उबाळे यांनी केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नसल्याने दलित आणि मुस्लिम समाजावर मोठय़ा प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत आहे. हत्याकांडातील गुन्हेगारांना पकडण्यात शासन हतबल ठरले असल्याचा आरोप ग्रामीण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाच्या विरोधी घोषणा दिल्या. नायब तहसीलदार संघमित्र बाविस्कर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्या वरिष्ठांना कळवून कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार महेंद्र पवार यांनी आंदोलकांना दिले. आंदोलनात उबाळे यांच्यासह मारुती रुपवते, विलास रुपवते, संतोष रुपवते आदी उपस्थित होते.