विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटनेने मंगळवारी सदर येथील जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात निदर्शने केली. यानंतर संघटनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. बुधवारी जिल्हा बैठकांवर बहिष्कार टाकला. २ जूनला सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करण्यासह अनेक मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहेत. अनेकदा निवेदने, आंदोलन करून शासनाने प्रतिसाद दिला नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता डॉक्टरांनी थेट रस्त्यावर उतरण्याचे ठरवले आहे. २६ मे रोजी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले. २७ मे रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात निदर्शने करण्यात आली. तर २८ मे रोजी जिल्हा बैठकांवर बहिष्कार टाकला. २९ ते ३० मे पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहिती (रिपोर्टिग) देणे बंद करण्यात येणार आहे. या असहकार आंदोलनात रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून बाह्य़रुग्ण विभाग बंद न ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.
फक्त अत्यवस्थ रुग्णांची तपासणी तसेच शवविच्छेदन एवढेच काम करणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी दिला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी बंद केली आहे. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून ६ जूनपर्यंत केवळ आपात्कालिन सेवा पुरवली जाणार
आहे. ६ जूनपर्यंत शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास ७ जूनपासून सर्व डॉक्टर्स राजीनामे देणार असल्याचेही डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी सांगितले.