नाशिकमध्ये डेंग्यूचे सावट
डेंग्यूची वाढती तीव्रता आणि बळीची संख्या पाहता सुस्तावलेला आरोग्य विभाग सक्रिय झाला असल्याचा दावा महापालिका करत आहे. या आजाराचे संकट आपल्या प्रभागावर येऊ नये यासाठी काही मोजके नगरसेवक स्वखर्चाने स्वच्छता मोहीम, फवारणी आदी कार्यक्रम राबवत असताना दुसरीकडे अनेक नगरसेवकांनी मात्र असे काही उपक्रम राबविण्याऐवजी स्वस्थ बसून आपली निष्क्रियता अधोरेखित केली आहे.
डेंग्यूचा डंख नगरसेविका अर्चना जाधव यांचे पती संजय जाधव यांना बसला आणि पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पालिका आयुक्तांपासून महापौरांपर्यंत झाडून सारेच कामाला लागले. काही नगरसेवकही मागे राहिले नाहीत. त्यांनी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी होत प्रभागाच्या स्वच्छतेकडे जातीने लक्ष दिले आहे. मनसेचे नगरसेवक बापू सोनवणे यांनी आपल्या प्रभागातील मोकळे भूखंड, मैदान यांसह गल्लीतील कोपऱ्यावर जमा होणारा कचरा, अस्वच्छ पाणी यांसह अन्य बाबींकडे लक्ष पुरवत डासांच्या निर्मूलनासाठी धुराळणी, फवारणी आदी कामे स्वखर्चाने केली. त्याच परिसरातील प्रभाग क्रमांक ५३ च्या नगरसेविका अर्चना जाधव यांनी मधल्या काळात स्वच्छता मोहीम राबवत जनजागृतीवर भर दिला. स्वखर्चाने परिसरातील मोकळे भूखंड स्वच्छ करण्यात आले. मात्र आपल्या सहकाऱ्यांच्या कामकाजाकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत ५२ च्या नगरसेविका वंदना बिरारी यांचे काम सुरू असल्याची तक्रार आहे. प्रभाग क्र. ५२ अ मध्ये मोठय़ा प्रमाणावर मोकळे भूखंड आहेत. त्यांचा वापर नागरिक सार्वजनिक कचराकुंडी म्हणून करतात. यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले. शिवाय घंटागाडी नियमित नाही. निवासी आवारात गोठा असून त्यामुळे अस्वच्छतेत भरच पडत आहे. डेंग्यूची तीव्रता वाढत असताना डासांच्या निर्मूलनासाठी धूरफवारणी सहा महिन्यांत झालेली नाही. याशिवाय दूषित पाण्यावर करण्यात येणाऱ्या फवारणीसही एक वर्षांचा कालावधी लोटला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता डेंग्यू डासांमुळे होतो. त्यामुळे पाण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असे सांगून परिसरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी मौन बाळगले.
नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्र. ४६ सह अनेक प्रभागांत डास फवारणी, धुराळणी अथवा कचरा हटविण्याचे काम अनेक महिन्यांत झालेले नाही. ही प्रक्रिया पार पाडावी यासाठी नगरसेवकही पाठपुरावा करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक ठिकाणी गटारे तुंबली आहेत. यामुळे गटारीतून घाण पाणी बाहेर पडत आहे. प्रभाग क्र. २२ मध्ये मोकळ्या भूखंडाचा वापर उच्चभ्रू परिसरातील नागरिक सार्वजनिक कचराकुंडी म्हणून करत आहेत. डेंग्यूचे सावट असताना नगरसेवक आणि आरोग्य विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. मोकळ्या भूखंडाचा कचराकुंडी म्हणून मुक्तहस्ते वापर होऊ देणाऱ्या जागामालकांवर महापालिका कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. प्रभाग क्र. ३१ मध्ये धूर फवारणी वा तत्सम काहीही हालचाल झालेली नाही. सातपूर परिसरातील प्रभाग क्र. १९ मध्ये नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे बुधवारी डास निर्मूलनासाठी मोजक्याच ठिकाणी फवारणी करण्यात आली. मात्र परिसरात घंटागाडी, कचरा हे प्रश्न अनुत्तरित आहेत. पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये तर डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असावेत, अशी भीती या भागातील रहिवासी व समाजसेवक सचिन अहिरे यांनी व्यक्त केली. बळी मंदिर, सरस्वतीनगर परिसरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे. सफाई कर्मचारी कधी येत नाहीत. उघडय़ा नाल्याचा कचरा टाकण्यासाठी वापर केला जातो. नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविण्याची तसदी घेतलेली नाही. डेंग्यूचे सावट रोखण्यासाठी काही नगरसेवक स्वत:हून पुढाकार घेत असताना काही प्रभागात मात्र नगरसेवकांनी उपाय योजण्याकडे डोळेझाक केल्याचे पाहावयास मिळत आहे.