‘मानवसेवा म्हणजे ईश्वर सेवा’ असे व्रत घेतलेल्या डोंबिवलीतील ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ संस्थेच्या वतीने बुधवारी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात कैद्यांच्या दंत तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या सहकार्याने मैत्री चॅरिटेबल ट्रस्टने हा अगळावेगळा उपक्रम राबवला होता. या वेळी कारागृहातील १८० कैद्यांच्या दातांची तपासणी करण्यात आली. या वेळी मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. मालिनी, जगदीश, अजिंक्य, डॉ. मिहीर, डॉ. केदार, डॉ. अनुश्री उपस्थित होते.
डी. वाय. पाटील दंत चिकित्सा विभागाच्या मुख्य डॉक्टर शिबा मोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. या वेळी आधारवाडी जेलचे मुख्य अधीक्षक शरद शेळके, उपअधीक्षक पवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी कापडे आणि गुरुजी यांनी या उपक्रमास सहकार्य केले. या कैद्यांपैकी १८० जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४० जणांवर बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.