ठेवीची मुदत संपून पाच वर्षांचा कालावधी गेला असताना पत्नीच्या उपचारासाठी पैसे मागूनही ते संबंधित पतसंस्थेतून मिळाले नाहीत. शेवटी पत्नीचा मृत्यू झाल्याने हताश झालेल्या सेवानिवृत्त ठेवीदाराने जिल्हा उपनिबंधकांकडे कैफियत मांडली. सहनिबंधकांमार्फत पतसंस्था चालकांना आदेश देण्यात आले. त्या आदेशाला दोन महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त ठेवीदाराने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव परिसरातील मूळ रहिवासी असलेल्या भीमराव फुला मांडोळे हे राज्य परिवहनच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर २१ जुलै २००३ रोजी ७५ हजार रुपयांची रक्कम जळगाव येथील हरनारायण राठी पतसंस्थेत दामदुप्पट योजनेत भविष्यातील तरतूद म्हणून ठेवली. त्यांना २१ ऑगस्ट २००८ रोजी या ठेवीचे दीड लाख रुपये मिळणार होते. तथापि ठेवीची मुदत संपून पाच वर्ष झाल्यानंतरही पतसंस्थेकडून मांडोळे यांना वारंवार फेऱ्या मारूनही रक्कम मिळालेली नाही. कमलकुमार बाजीराव श्रावगी हे पतसंस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा मुलगा नितीन हा संस्थेचा कारभार पाहतो. व्यवस्थापक किशोर वाणी यांनाही मांडोळे पाच वर्षांत शंभर वेळा भेटले. परंतु त्यांना नेहमी पुढील तारीख देण्यात आली.
दरम्यान मांडोळे यांची पत्नी आजारी पडली. पत्नीच्या उपचारासाठी तरी पैसे मिळतील म्हणून मांडोळे यांनी श्रावणी यांच्या मुलाकडे वारंवार विनंती केली. बॉम्बे रुग्णालयातील डॉक्टरांच्या पत्रांसह त्यांनी अहवाल दिला. पण पैसे मिळाले नाहीत. अखेर उपचाराअभावी १९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. असहाय्य मांडोळे यांनी यासंदर्भात जळगावातील एका नातलगामार्फत जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यावेळी उपस्थित सहउपनिबंधकांनी  तालुका उपनिबंधक अशोक गारडी यांना वृद्ध तसेच सेवानिवृत्त ठेविदारास निदान अर्धी रक्कम आठ दिवसात देण्यास बजावले. त्यांच्या या आदेशास दोन महिने झाल्यानंतरही मांडोळे यांच्या हाती काहीही पडलेले नाही.
पतसंस्था चालकांचा हा उद्दामपणा तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका उपनिबंधकांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ मांडोळे यांनी कमलकुमार श्रावगी या पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावणी यांचा मुलगा तसेच व्यवस्थापक किरण वाणी यांच्याकडून आपणास अनेकवेळा ५० टक्के रक्कम घेऊन तडजोड करण्यास सूचित करण्यात आल्याचेही मांडोळे यांनी म्हटले आहे.