डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये मद्यपान करून धांगडधिंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मद्यविक्री करून महामानवाच्या जयंती उत्सवाचे पावित्र्य भंग करू पाहणाऱ्यांना पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी सक्त ताकीद दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पाश्र्वभूमीवर नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपायुक्त पाटील यांनी आंबेडकर जयंतीचे महत्व सर्वाना समजावून देतानाच जयंती शांततेने साजरी करण्याकडे लक्ष देण्याची सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केली. जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यावरून वाद उद्भवत असतील तर सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जयंती उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत काही जण मद्यधुंद अवस्थेत शिरकाव करून विचित्र हावभाव करतात. अशा मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न केल्यास ते समजण्याच्या परिस्थितीत नसतात. अशा मंडळींमुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता असते. नेमका हाच धागा पकडून उपायुक्त पाटील यांनी मिरवणुकीत मद्यधुंद अवस्थेत कोणत्याही कार्यकर्त्यांने सहभाग घेऊ नये, असे बजावले.
महिलांनी अशा कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. उपायुक्तांनी सूचना केली असली तरी खरी जबाबदारी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आहे. जयंतीचे पावित्र्य जपण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.