मागासक्षेत्र विकास अनुदान निधीवाटपास पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी स्थगिती दिल्याने हतबल सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देताच विरोधक संतप्त झाले आहेत. घेरावचा प्रयत्न केल्यास सत्ताधाऱ्यांची एकही बैठक होऊ दिली जाणार नाही, असा इशारा देतानाच सत्ताधाऱ्यांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाल्याचा टोलाही विरोधकांनी लगावला.
जि. प.च्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाभर चर्चा गाजत आहे. सभागृहातील विरोधी पक्षांचे गटनेते मुनीर पटेल व विनायक देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सत्ताधारी शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असतानाही विकासकामे करता येत नाहीत. त्यामुळे जनतेला काय उत्तर द्यावे, यासाठी विरोधकांना दोष देण्याचा सोपा मंत्र अवलंबित आहेत. बीआरजीएमच्या निधीवाटपाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर सत्ताधारी शिवसेनेच्याच दहा सदस्यांच्या सह्य़ा आहेत, असा आरोप त्यांनी केला. दलित वस्तीसाठी राज्य सरकारने शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा साडेआठ कोटींचा निधी दिला. मात्र, सत्ताधाऱ्यांना प्राप्त निधी खर्चाच्या नियमाप्रमाणे नियोजन करता आले नाही. परिणामी पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.