सोलापूरच्या सुशील सोशल फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदे पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख (बुलढाणा), प्रख्यात पत्रकार जावेद आनंद (मुंबई) व लेखक अण्णा हरी साळुंखे (सातारा) यांना जाहीर झाला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुशील सोशल फोरमचे संस्थापक-अध्यक्ष, माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. काँग्रेसच्या नेत्या उज्ज्वला शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहेत. या वेळी महापौर अलका राठोड, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विष्णुपंत कोठे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सुशील सोशल फोरमच्या पुरस्काराचे यंदाचे हे सातवे वर्ष आहे. या अगोदर डॉ.जनार्दन वाघमारे, शरणकुमार लिंबाळे, डॉ.दीपक टिळक, प्रताप आसबे, सुरेखा दळवी, दत्ता कोळेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.सूर्यनारायण रणसुभे, डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, सदा डुंबरे आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार निवड समितीवर पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. यशवंत सुमंत, प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर व डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी काम पाहिले. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. करिमुन्निसा बागवान, अनंत जोशी, हणमंतु सायबोलू, प्रमिला तूपलवंडे आदी उपस्थित होते.