News Flash

देशपांडे सभागृहावर प्रस्थापित ठेकेदारांचा अघोषित ‘कब्जा’

हौशी, व्यवसायिक कलावंताना आणि विविध सामाजिक आणि राजकीय संस्थाना कार्यक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने बांधण्यात आलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहावर सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात

| January 29, 2013 12:59 pm

हौशी, व्यवसायिक कलावंताना आणि विविध सामाजिक आणि राजकीय संस्थाना कार्यक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने बांधण्यात आलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहावर सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही प्रस्थापित ठेकेदारांनी आणि सभागृह व्यवस्थापनामधील कर्मचाऱ्यांनी वर्चस्व निर्माण केल्यामुळे अनेक संस्थाना नाहक फटका बसू लागला आहे. शिवाय संस्थाना देण्यात आलेल्या तारखांच्या गोंधळामुळे तिकीट खरेदी करणारे प्रेक्षकही वेठीस धरले जात आहेत.
प्रख्यात शास्त्रीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे मूळचे विदर्भाचे असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर २० वर्षांपूर्वी त्यांच्या नावाने नागपुरात सभागृह बांधण्यात आले आहे. कलावंताना व्यासपीठ मिळावे य़ा उद्देशाने युतीच्या काळात पाचशे रुपये सभागृह उपलब्ध करून दिले जात असे मात्र काँग्रेसचे सरकार सत्तेत येताच सभागृहाच्या भाडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ केली आणि आता एका शिफ्टचे (चार तास) १० ते १२ हजार रुपये संस्थाना द्यावे लागतात. सभागृहाची जबाबदारी सार्वजानिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे या सभागृहाचे बुकींग त्यांच्यामार्फत केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील काही सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या ठेकेदारांनी सभागृहाच्या व्यवस्थापनाला आणि सार्वजानिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून देशपांडे सभागृहाचे बुकींग हे त्यांच्या मर्जीनुसार सुरू केले.
हौशी नाटय़ किंवा सामाजिक संस्था सभागृहात कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने बुकिंगसाठी जात असतात तर त्यांना सभागृह खाली नसल्याचे सांगितले जाते. सभागृह हवे असेल तर संबंधित व्यक्तींना जाऊन भेटा त्यांनी जर कार्यक्रम केला नाही तर तुम्हाला मिळेल, असे सांगितले जाते. वसंतराव देशपांडे सभागृह जवळपास सात ते आठ महिने शनिवार आणि रविवारी रिकामे नसल्याचे सांगितले जाते. अनेकदा ज्या तारखांना आगाऊ बुकिंग केले जाते त्याच तारखांना आणि त्याच वेळेला दुसऱ्या संस्थेला सभागृह देण्याचा प्रकार अनेकदा झाला आहे.  या संदर्भात सार्वजानिक बांधकांम विभागाकडे अनेक कलावंतानी आणि संस्थानी तक्रारी करूनही मात्र त्याची कुठलीच दखल न घेतल्याने पुन्हा एकदा  ठेकेदारांच्या दादागिरीचा घोळ सुरू झाला आहे. रविवारी दुपारी १२ वाजता समीर पंडित यांच्या सिद्धीविनायक पब्लिसिटीतर्फे अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘माझिया भाऊजींना रित कळेना’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार होता. नेमकी दुपारी १ ते ४ ही वेळ अनिलकुमार टी कंपनीच्या कार्यक्रमाला दिली असल्यामुळे समीर पंडित यांनी १२ वाजता सुरू होणारे नाटक ११.३० वाजता सुरू केले. दरम्यान अनिलकुमार टी कंपनीचावार्षिक लकी ड्रॉचा दुपारी १ वाजता असल्यामुळे त्या कार्यक्रमासाठी आलेले प्रेक्षक बाहेर ताटकळत होते. सभागृहात नाटक सुरू असताना बाहेर गर्दी वाढू लागली. दरम्यान कार्यक्रमाचे आयोजक व अनिल टी कंपनीचे मालक अनिल अहिरकर यांनी नाटक सुरू असताना मध्येच रंगमंचावर प्रवेश करून प्रयोग बंद करण्याची सूचना केल्याने एकच गोंधळ उडाला. यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तेवढय़ापुरते संस्थाचे समाधान करतात मात्र या सरकारी कर्मचाऱ्यांच्या गोंधळामुळे प्रेक्षक वेठीस धरले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2013 12:59 pm

Web Title: deshpande hall is grab by the contractors
टॅग : Contractors
Next Stories
1 राजनाथसिंह यांनीही उधळली गडकरींवर स्तुतीसुमने
2 काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची चाचपणी
3 सामूहिक कॉपी प्रकरणाबाबतची याचिका अवमान याचिकेत परिवíतत करण्याची परवानगी
Just Now!
X