तालुक्यातील ग्रामदेवतांच्या जत्रांना सुरुवात झाली असून जत्रेतील परंपरेनुसार आपल्या देव तसेच देवीला मान देण्यासाठी गावठी कोंबडा दिला जातो. मात्र औद्योगिकीकरणामु़ळे गावपण हरविलेल्या उरण तालुक्यात गावठी कोंबडय़ांची वानवा आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातून येणाऱ्या गावठी कोंबडय़ांचे दर वाढले असून इतर दिवशी ३०० ते ४०० रुपयांना मि़ळणाऱ्या गावठी कोंबडय़ाच्या किंमती ६०० ते ८०० रुपयांवर पोहचल्या आहेत. वर्षांतून एकदा येणाऱ्या गावातील जत्रा किंवा यात्रा या येथील गाव, शेती तसेच जमिनीशी निगडित आहेत. गावाच्या रक्षणासाठी असलेल्या गावाच्या वेशीवरील जरीमरी, तिसाई आदी देवीच्या तसेच गावातील ग्रामदैवत बापदेव, ब्राह्मणदेव त्याचप्रमाणे शेतीच्या रक्षणासाठी स्थापन करण्यात आलेले बारांचा देव आदी देवांच्या या यात्रा असल्याने ग्रामस्थ मोठय़ा श्रद्धेने या देवांच्या यात्रांच्या दिवशी देवी किंवा देवाला मान देतात. यात काही ठिकाणी बोकडाचाही मान दिला जातो. मात्र सर्वसाधारणपणे कोंबडय़ाचा मान देण्याची प्रथा आहे. तसेच ज्यांना हे शक्य होत नाही, ते नारळ फोडून मान देतात. मात्र कोंबडय़ांच्या वाढत्या किमतीमुळे ग्रामस्थांच्या जत्रांवरही महागाईचा परिणाम जाणवू लागला आहे.