वाहतूक नियंत्रणासाठी उपराजधानीतील प्रमुख चौकांमधील लावलेल्या वाहतूक दिव्यांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचे चित्र आहे. डझनावारी चौकांमधील दिवे एकतर बिघडलेले आहेत किंवा व्यवस्थितपणे काम करीत नाहीत. यात वाहतूक पोलिसांच्या बेफिकिरीची भर पडत चालली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागपूरची वाहतूक रुळावर राहण्याची शक्यता नाही, अशीच चिन्हे दिसून येत आहेत.
नागपूर शहरातील १२८ चौकांमध्ये वाहतूक दिवे लावण्यात आले आहेत. ही संख्या शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वरवर पुरेशी वाटत असली तरी प्रत्यक्षातील स्थिती विसंगत आहे. डझनावारी दिवे बंद अवस्थेत असल्याने चौकांमध्ये होणारा गोंधळ संतापाला आमंत्रण देणारा ठरत असून यातून एखादा प्राणांतिक अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास असून दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या संख्येतही गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे. शहरातील रस्त्यांवर किमान १५ लाख वाहने रोज धावत असतात. त्या तुलनेत वाहतूक विभागाजवळ १ हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ असून हे संख्याबळ शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे नाही.
वाहन चालविणाऱ्यांची बेशिस्त वाहतूक यंत्रणेची ऐशीतैशी करीत आहेत. भरधाव मोटारबाईक चालविणारे, राँग साईडने निघणारे आणि सिग्नल तोडून भरधाव पळणारे वाहनचालक वाहतूक पोलिसांसाठी आणि नियम पाळणाऱ्यांसाठी डोकेदुखी झाले आहेत. झेब्रा क्रॉसिंग आणि स्टॉप लाईनचा वापर करण्याची शिस्तच नागपूरकरांना लावण्यात आलेली नाही. लाल दिवा लागलेला दिसत असूनही कुणीतरी मोटारबाईक अचानक वेगात पुढे दामटण्याचे चित्र शहराला नवीन राहिलेले नाही. पुरेशा संख्याबळाअभावी वाहतूक यंत्रणेलाही एवढा व्याप सांभाळणे कठीण जाते. वाहतूक पोलीस उपायुक्त जीवराज दाभाडे निवृत्त होऊन चार-पाच महिने झाले. अजूनही त्यांची जागा रिक्त आहे. झोन चारचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर मीणा यांच्याकडे वाहतूक शाखेचा प्रभारी कार्यभार आहे.
बंद सिग्नलमुळे रोज एखादा अपघात घडत आहे. तरुणाईच नव्हे तर वयस्क वाहनचालकांनादेखील वाहतूक सिग्नल तोडण्याची सवय लागली आहे. या लोकांवर कारवाईचे प्रमाण कमी असल्याने त्यांना जरब बसलेली नाही. वाहतूक पोलीस यंत्रणेने अशा वाहन चालकांविरुद्ध मोठी मोहीम उघडल्याशिवाय त्यांना धडा मिळणार नाही, असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस चलन कापण्यात व्यस्त असतात. नेमके त्याचवेळी अनेकजण त्यांच्या नाकावर टिच्चून सिग्नल तोडतात. काही वाहतूक सिग्नलवर टायमर लावण्यात आले आहेत. परंतु, हिरवा दिवा लागेपर्यंत थांबण्याचा संयम लोकांमध्ये नाही. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.