जायकवाडीला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्य़ातील साखर व दूधसम्राटांसह सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचा विरोध आहे, असा आरोप करतानाच उत्तर नगर जिल्ह्य़ातून मराठवाडय़ात येणाऱ्या दुधावर येथील जनतेने बहिष्कार घालावा, तसेच तेथील साखर कारखान्यांना येथून ऊसदेखील पाठवू नये, असे आवाहन जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने शुक्रवारी येथे करण्यात आले.
जायकवाडीच्या पाणीप्रश्नी समितीच्या वतीने क्रांती चौकात उत्तर नगर जिल्ह्य़ातील नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. जायकवाडीत भरपूर पाणी झाले असून आता पाणी सोडू नका, असे कोल्हे व मंत्री बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. याचा अर्थ जायकवाडीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यास या नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे कृती समिती उत्तर नगर जिल्ह्य़ातील नेत्यांचा निषेध करीत असून, हक्काच्या पाण्यासाठी आरपारच्या लढाईस सज्ज असल्याचे समितीने म्हटले आहे. समितीचे जयाजीराव सूर्यवंशी, कैलास तवर, सतनाम गुलाटी, प्रकाश लबडे, कल्याण गायकवाड, डॉ. सुरेश चौधरी, डॉ. रमेश बडे, कैलास शेंगुळे, आबासाहेब मोरे, अनिल सटाळे आदींच्या या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर सह्य़ा आहेत.