संत चोखामेळा यांच्या मेहुणाराजा येथील जन्मस्थळ विकासाकरीता जिल्हा परिषद प्रशासन कटीबध्द आहे. येत्या काळात त्यांचे जन्मस्थळ मेहुणाराजा व कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा या स्थळाचा प्राधान्याने विकास करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा वर्षां वनारे यांनी दिली.
तालुक्यातील मेहुणाराजा येथे संत चोखामेळा यांचा ७४५ वा जन्मोत्सव जिल्हा परिषद व ग्रामस्थांच्या वतीने  उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी गावातून चोखोबाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.  जिल्हा परिषद अध्यक्षा वर्षां वनारे, रजनी राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद सदस्या शारदा दंदाले व सविता मुंढे यांच्या हस्ते संत चोखोबाची महापुजा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सभापती माया चव्हाण, प्रदिप नागरे, नंदाताई कायंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख , अभ्यासक प्रा. कमलेश खिल्लारे, बाबुराव नागरे, नंदाताई शिंगणे, सिध्दीक कुरेशी, अनिता झोटे व उषा काकडे आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी सपकाळ म्हणाले की, संत चोखामेळा हे विदेही संत होते. त्यांची विठ्ठल भक्ती निर्मळ असल्याने विठ्ठलाला त्यांना दर्शन देणे भाग पडले. संताच्या शिकवणुकीतून काहीतरी घ्यावे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु या बरोबरच महान संताच्या जन्मस्थळाचा विकास देखील होणे आवश्यक आहे. हा सोहळा २५ हजाराच्या निधीपासून सुरू करण्यात आला. आता हा निधी एक लाख करण्यात आला आहे. विकासकामासाठी गावाचा सहभाग आवश्यक असल्याने येणारा निधी हा ग्रामपंचायतीला देण्यात यावा, अशी अपेक्षा येथेच झाल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रदीप नागरे यांनी संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव लोकोत्सव होण्यासाठी पर्यटन स्थळ होणे महत्त्वाचे आहे. या महान संताची शिकवण घेता यावी, यासाठी वारकरी संस्था सुरू करावी, अशी मागणी केली.   महान संताचे  विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे नंदा कायंदे यांनी सांगितले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख  कुमठे यांनी केले. कार्यक्रमासाठी सरपंच उषा काकडे, उपसरपंच भगवान चाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.