* मालमत्ता करवसुलीत मुंब्रा पिछाडीवर
* कळव्यात १०० टक्के वसुली
* ठाणे परिसरात वसुलीचा उच्चांक
मुंब्रा परिसराच्या विकासासाठी ठाणे महापालिकेने कोटय़वधी रुपयांच्या विकास कामांचा रतीब मांडला असला तरी या भागातील बहुतांश रहिवाशांचा अजूनही महापालिकेस असहकार सुरू असल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा करवसुलीचा नवा उच्चांक प्रस्थापित करीत तब्बल ९६ टक्के वसुलीचा लक्षणीय असा आकडा गाठला आहे. ठाणे शहर, कोपरी, वागळे, वर्तकनगर, घोडबंदर, कळवा या भागातील रहिवासी महापालिकेच्या तिजोरीत भरभरून असे कराचे दान टाकत असताना मुंब्रा भागातील रहिवाशांनी मात्र दरवर्षीप्रमाणे मालमत्ता कर विभागास ठेंगा दाखविला आहे. यंदाही मुंब्रा भागातील जेमतेम ५२ टक्के रहिवाशांनी मालमत्ता कराचा भरणा केल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सध्या चिंतातुर बनले आहेत. विशेष म्हणजे, शेजारच्या कळवा भागातील रहिवाशांकडून १०० टक्के वसुली करण्यात यश आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंब्य्रात प्रभावी कामगिरी का करता आली नाही, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ९६ टक्के म्हणजेच २४६ कोटी ५७ लाख रुपये इतकी वसुली केली असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त वसुली झाली आहे. तसेच महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या हद्दीत शंभरहून अधिक टक्के मालमत्ता कराची वसुली झाली आहे. असे असले तरी मुंब्रा प्रभाग समितीमधून मात्र ५२ टक्केच मालमत्ता कराची वसुली होऊ शकली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंब्रा विभागाकरिता भरीव तरतूद करणाऱ्या महापालिका प्रशासनाला या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना पुन्हा कोंडीत पकडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाला वसुलीचे २५८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. तसेच मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करता यावी यासाठी कठोर पावले उचलण्यासाठी राजीव यांनी जातीने लक्ष घातले. गेल्या वर्षांपासून ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेमुळे नव्याने उभ्या राहिलेल्या तसेच अनधिकृत मालमत्तांचा शोध घेता येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. दरम्यान, या वर्षीचे करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी महापालिकेने काही विशेष पथके तयार केली होती. गेल्या काही महिन्यांपासून या पथकाच्या माध्यमातून सर्व प्रभाग समित्यांच्या हद्दीत मालमत्ता कराची वसुली सुरू होती. आर्थिक वर्षअखेर २४६ कोटी ५७ लाख रुपयांची म्हणजेच ९६ टक्के मालमत्ता कराची वसुली करण्यात महापालिकेला यश आले असून गेल्या काही वर्षांतील ही सर्वात जास्त वसुली आहे. महापालिकेने नौपाडा-२८.३४ कोटी रुपये (१०२ टक्के), उथळसर – २४.४९ कोटी रुपये (१०२ टक्के), कोपरी – ५.३८ कोटी रुपये (१०६ टक्के), वागळे – १६.२६ कोटी रुपये (१०९ टक्के), रायलादेवी – १०.४५ कोटी रुपये (१०८ टक्के), वर्तकनगर – ४५.०४ कोटी रुपये (१०१ टक्के), माजिवाडा- ४८.१८ कोटी रुपये (१०२ टक्के), कळवा – १५.३८ कोटी रुपये (१०० टक्के) आणि मुंब्रा – २०.३५ कोटी रुपये (५२ टक्के), अशी मालमत्ता कराची वसुली झाली आहे. ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कळवा-मुंब्रा विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मुंब्रा भागातून मालमत्ता कराची वसुली कमी होत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला कोंडीत पकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. वर्षअखेर इतर प्रभाग समित्यांच्या तुलनेत मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वात कमी वसुली झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना पुन्हा महापालिका प्रशासनाला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मालमत्ता कराच्या वसुलीचा उच्चांक गाठणाऱ्या महापालिका प्रशासनाची मुंब्रा विभागामुळे डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.