भाजप प्रदेश भाजपाध्यक्ष पदासाठी दक्षिण-पश्चि नागपूर विधानसभा मतदारसंघाचे तरुण आमदार व भाजपचे प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस यांचे नाव अचानक शर्यतीत आल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळू लागल्याने नागपुरातील समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या दोन दिवसात प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार असून शर्यतीत असलेल्या अन्य नावांमध्ये फडणवीस यांनी आता आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, नागपुरात एकाच पक्षाची दोन सत्ताकेंद्रे राहण्याची शक्यता राजकीय समीकरणांच्या पातळीत बसणारी नसल्याने शेवटच्या क्षणी हा निर्णय फिरविला जाऊ शकतो. राज्य भाजपात गडकरी-मुंडे यांच्यातील संघर्ष लपून राहिलेला नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर स्वत:च्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्नरत आहेत.