गोष्ट फार जुनी नाही. साधारणत: दोन वर्षांपूर्वीची. भाजपचे आमदार आणि मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असणारे देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेच्या येथील भोसला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. या विषयात त्यांचा चांगला अभ्यास आहे हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ज्ञात होते. पण त्यांचे मार्गदर्शन ऐकल्यावर सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आपत्ती व्यवस्थापनातील त्यांच्या दांडग्या अनुभवाची सर्वाना प्रचीती आली. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्यानंतर कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम आणि कुशल नेतृत्व राज्याला लाभल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या वर्तुळात उमटत आहे.
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेशी फडणवीस हे जवळपास १५ वर्षांपासून संबंधित आहेत. दहा वर्षांपासून संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. २०१२ मध्ये पुणे विद्यापीठांतर्गत संस्थेच्या भोसला महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केल्याची आठवण संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर यांनी सांगितली. पारदर्शक कामासाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रशासनाचाही चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. नागपूरचे अनेक प्रश्न महापौरपदी असताना त्यांनी कायमस्वरूपी सोडविले. नागपूर येथे संस्थेच्या एका इमारतीत भरणाऱ्या सैनिकी शाळेसाठी फडणवीस यांनी शहरालगत ३० एकर जागेत भव्य वास्तू उभारली. आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव त्यांनी साकारला आहे. विकासाची दृष्टी असणारे हे व्यक्तिमत्त्व असल्याचे डॉ. बेलगांवकर यांनी नमूद केले. नाशिक विभागाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी यांनी फडणवीस यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांच्या धडाकेबाज कामाचे उदाहरण मांडले. आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून अतिशय कमी शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यातून विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था होणेही अशक्य होते. ही बाब फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आली. त्यांनी मग आदिवासी मंत्री आणि अधिकाऱ्यांसमोर या विद्यार्थ्यांच्या सैनिकी शिक्षणातील अडथळे मांडले. पाठपुरावा करून प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २० हजार रुपये मिळणारी शिष्यवृत्ती ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली, असे कुलकर्णी यांनी सांगितले.