शहरातील सहाही जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील सत्तापक्ष नेता कोण, यावरून फडणवीस व गडकरी समर्थक पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून हा वाद आता प्रदेश पातळीवर गेला आहे.
शहराचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यात फारसे सख्य नाही, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. या दोन्ही नेत्यांचे समर्थक या चर्चेत हिरीरीने सहभागी होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत शीतयुद्धाला अद्याप जाहीर तोंड फुटले नसले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये फारसा स्नेहबंध राहिला नाही, ही बाब आता लपून राहिलेली नाही. या पाश्र्वभूमीवर आता महापालिकेतील राजकारणावरून आणखी एक वाद निर्माण झाला आहे. या वादालासुद्धा या दोघांमध्ये सुरूअसलेल्या शीतयुद्धाची किनार आहे. या शहराचा नवा महापौर निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक नुकतीच झाली. यात प्रवीण दटके यांचे नाव महापौर तर उपमहापौर पदासाठी मुन्ना पोकुलवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. याच बैठकीत महापालिकेतील सत्तापक्षनेतेपद गिरीश देशमुख यांना देण्याचे ठरविण्यात आले. संसदीय मंडळाचा हा निर्णय प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे मान्य केला नसल्याने हा नवा वाद आता निर्माण झाला आहे. सत्तापक्षाचे नेतेपद गिरीश देशमुख यांना न देता या पदावर संदीप जोशी यांची निवड करण्यात यावी, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. संदीप जोशी हे फडणवीसांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पदवीधर मतदार संघात संदीप जोशींना उमेदवारी मिळावी म्हणून फडणवीसांनी प्रयत्न केले होते. गडकरींच्या हस्तक्षेपामुळे ते जमू शकले नाही. त्यामुळे आता त्यांना किमान महापालिकेतील नेतेपद मिळावे यासाठी फडणवीसांचा आग्रह आहे. संसदीय मंडळाने सुचवलेले गिरीश देशमुख हे खामल्याचे नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे त्यांचा प्रभाग देवेंद्र फडणवीस आमदार असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात येतो. मात्र देशमुख हे मावळते महापौर अनिल सोले यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सोले हे गडकरींचे समर्थक असल्याने त्यांच्यात व फडणवीसांमध्ये फारसे सख्य नाही. त्यामुळेच फडणवीसांनी देशमुखांच्या नावावर फुली मारल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे. संसदीय मंडळाचा निर्णय पक्षाने विनातक्रार मान्य करणे अशी भाजपची आजवरची परंपरा राहिली आहे. अपवादात्मक स्थितीतच मंडळाच्या निर्णयात वरिष्ठ नेते हस्तक्षेप करतात. या प्रकरणात फडणवीसांनी केलेला हस्तक्षेप शहरातील गडकरी समर्थकांना अजिबात रुचलेला नाही. फडणवीसांचा देशमुखांना विरोध आहे, ही बाब या समर्थकांनी नितीन गडकरी यांच्या कानावर टाकली. मात्र, त्यांनी या मुद्यावर मौन पाळणेच पसंत केले. गडकरींनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला तर देशमुख यांच्या नावाला हिरवी झेंडी मिळू शकते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. गडकरी मोक्याच्या क्षणी मौन बाळगत राहिले तर फडणवीस समर्थक डोईजड होतील, अशी भीती त्यांचे समर्थक बोलून दाखवतात. प्रदेशाध्यक्ष या नात्याने संसदीय मंडळाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार फडणवीसांना आहे. तो वापरून ते संदीप जोशींची वर्णी या पदावर लावतील हे निश्चित आहे. नेमकी हीच बाब गडकरी समर्थकांना खटकत आहे. विशेष म्हणजे महापौरपदासाठी निवड झालेले प्रवीण दटके यांना आमदार होण्याची इच्छा आहे. त्यामुळे यावेळी ते या पदाची झुल पांघरण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. तरीही त्यांच्या गळयात माळ टाकण्यात आली. यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांच्याशी संपर्क साधला असता, सत्तापक्ष नेता कोण हे फडणवीस व गडकरी एकत्र बसून ठरवतील. संसदीय मंडळात यासंदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही, असे व्यास यांनी सांगितले.