मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील संगीतप्रेमी रसिकांना अभिजात संगीताची मेजवानी देणाऱ्या ‘ कल्याण गायन समाजा’च्या ‘देवगंधर्व महोत्सवा’ची यंदा तपपूर्ती असून येत्या १२ ते १५ डिसेंबर दरम्यान तो साजरा होणार आहे. दिग्गज कलावंतांच्या साथीने नव्या दमाच्या तरुण कलाकारांचे सादरीकरण हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. गायन, नृत्य आणि वादनाच्या स्वतंत्र मैफलींचा यंदाच्या महोत्सवात समावेश आहे.  
पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मृती जपण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देवगंधर्व महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष आहे. त्यामुळे यंदा या महोत्सवाची तपपूर्ती होत आहे. २००२ साली संस्थेने जीर्ण झालेल्या गायन समाजाची वास्तू नव्याने बांधण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्यानिमित्ताने देवगंधर्व महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्यावर्षी संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन महोत्सवाच्या दरम्यान झाले.  
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी रात्री नऊ वाजता तालवाद्यांचे फ्यूजन (तालचक्र) होणार असून त्यामध्ये विजय भाटे-तबला, शौनक अभिषेकी-गायन, राकेश चौरसिया-बासरी, मुकुल डोंगरे-ड्रम, श्रीधर पार्थसारथी-पखवाज, अतुल रनिंगा-कीबोर्ड, कावेरी सागेदार, शीतल कोलवेकर नृत्य सादर करणार असून राहुल सोलापूरकर यांचे निवेदन या कार्यक्रमात असणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री नऊ वाजता कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे आपल्या विविध नृत्याविष्काराचे दर्शन घडवणार आहेत तर दुसऱ्या सत्रात रवींद्र चारी सतार आणि आदित्य कल्याणपूर तबला वादन करणार आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी रात्री नऊ वाजता कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होईल. त्यांना सत्यजित तळवलकर-तबला तर अजय जोगळेकर संवादिनी साथ करणार आहेत. रविवारी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता पं. दिनकर पणशीकर यांचे गायन तर दुसऱ्या सत्रात पं. सपन चौधरी यांचा तबला सोलो असे वैविध्यपूर्ण सादरीकरण यंदाच्या महोत्सवातून रसिकांना अनुभवता येणार आहे.