सर्व शिक्षा अभियानासारख्या योजनांमुळे शिक्षणविषयक पायाभूत सुविधा देशात मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत असल्या, तरी गुणवत्तापूर्ण शिक्षण अजून खूप दूरच आहे, असे प्रतिपादन नियोजन आयोगाच्या सदस्या डॉ. सय्यदा हमीद यांनी शनिवारी केले. शिक्षण व्यवस्थेवर समाजाचे तसेच स्वयंसेवी संस्थांचे पर्यवेक्षण आवश्यक असून देशात महाराष्ट्र त्याचा आदर्श आहे, असेही त्या म्हणाल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे डॉ. हमीद यांच्या बरोबर आयोजित वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. सर्व शिक्षा अभियानामुळे खेडोपाडी शिक्षणासाठीच्या किमान पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. पुढील टप्प्यात शिक्षक उपलब्ध होतील. त्यानंतर सर्व प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण होईल आणि ते गुणवत्तापूर्ण असेल यासाठी योजना येतील. मात्र, एकूण परिस्थिती पाहता गुणवत्तापूर्ण शिक्षण ही खूप लांबची गोष्ट आहे, असे डॉ. हमीद म्हणाल्या.
केंद्राकडून राज्यांना निधी पाठवला जातो; पण त्यावर लक्ष कोण ठेवते हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी समाजातील मंडळींनी, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र हा त्यासाठी आदर्श आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत महाराष्ट्रात चांगलीच जागरूकता आहे.
तोंडी तलाक हा इस्लामचा लावण्यात आलेला अत्यंत चुकीचा अर्थ आहे आणि त्यासाठी मुसलमानांनाच दोष द्यावा लागेल, असे स्पष्ट प्रतिपादनही डॉ. हमीद यांनी वार्तालापात केले. वास्तविक तलाक असे तीनदा म्हणून तलाक देण्याची पद्धतच इस्लाममध्ये नाही, तर एकदा तलाक म्हणून त्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यासाठी महिनाभर वेळ देण्यात आलेला आहे. मी काही आततायीपणा तर करता नाही ना याचा विचार या काळात करावा अशी अपेक्षा आहे. मग दुसरा महिना, मग तिसरा महिना आणि त्यानंतर निर्णय अशी पद्धत असताना तीनदा तलाक म्हणून तलाक दिला जातो आणि ते चुकीचेच आहे. यासंबंधी इस्लामने सांगितलेला कायदा कोणीही पाळत नाही आणि ते इस्लामच्याच विरुद्ध आहे, असेही डॉ. हमीद म्हणाल्या.
हाजीअली दग्र्यातील पवित्र वास्तूमध्ये मुस्लिम महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या निर्णयाबाबत त्या म्हणाल्या की, इस्लामशी काहीही देणेघेणे नसलेला हा निर्णय आहे.