लालबाग-परळ आणि गिरगावातीस गणपती पाहण्यासाठी सर्व मुंबईतील भक्तांची रीघ लागते. उपनगरांमध्ये ही लोकप्रियता अंधेरीच्या राजाला मिळाल्याचे दिसते. अंधेरीच्या राजाकडे जायचे आहे, असे सांगितल्यावर अंधेरी स्टेशनवर रिक्षावाले इतर कोणताही पत्ता विचारत नाही. अंधेरी क्रीडा संकुलाजवळ असलेला अंधेरीचा राजा पाहायला भक्तगणांची रीघ लागलेली असते.
उपनगरांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंधेरीच्या राजासाठी यावेळी रांजणगावातील महागणपती मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावातील महागणपतीच्या मंदिराची हुबेहुब प्रतिकृती दीड महिन्याच्या प्रयत्नांती साकार झाली आहे. अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडून १९६७ पासून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मंडळासाठी दरवर्षी भक्तांकडून मूर्ती दिली जाते. यासाठी २०५६ या वर्षांपर्यंत भक्तांची प्रतिक्षायादी आहे. मंडळांच्या कार्यकारणीने २०३० पर्यंत भक्तांची नावे नक्की केली आहेत. गेल्यावर्षी अंधेरीच्या राजासाठी राजस्थानमधील दिलवाडा मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यापूर्वी गोव्याच्या मंगेशीचे मंदिर तसेच सोमनाथाच्या मंदिरात राजाला स्थानापन्न करण्यात आले होते. यावर्षी रांजणगाव येथील मंदिराचा अभ्यास करण्यात आला. त्याच पद्धतीचे कौलारू मंदिर, त्यातील बारकाव्यांसह उभे करण्यासाठी राकेश हांडे व राजीव चावला यांनी मदत केली अशी माहिती मंडळाचे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली. पावसामुळे बाहेरच्या बाजूने मंदिराचा देखावा उभा करण्यास अडथळे येतात. त्यामुळे मंदिर उभारून त्याभोवताली कापडी मंडपाचे आच्छादन करण्यात आले आहे. सभामंडप, मूषक, हत्ती आणि गाभाऱ्यात श्रींची मूर्ती यामुळे महागणपतीच्या मंदिरात गेल्याचा भास होतो.
अंधेरीचा राजा मंडळाकडून दरवर्षी सामाजिक कार्यातही सहभाग दिला जातो. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेऊन याबाबत जनजागृती तसेच अवयवदानाची इच्छा असलेल्यांना यासंबंधी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती व अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. अंधेरीच्या राजाचे विसर्जन अनंतचतुर्दशीऐवजी संकष्टीला करण्यात येते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी विसर्जनाची मिरवणूक निघणार असून दुसऱ्या दिवशी जुहू येथील किनाऱ्यावर पोहोचेल.
अंधेरीच्या राजाचे व्हिडियो चित्रिकरण  youtube.com/LoksattaLive या लिंकवर पाहता येईल.