नांदेड-वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे गणपत धबाले विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या डिंपलसिंग नवाब यांचा पराभव केला.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. महापालिका तिजोरीच्या किल्ल्या कोणाच्या हाती जातील, या बाबत कमालीची उत्सुकता होती. सरजितसिंघ गिल व सतीश राखेवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धबालेंना संधी दिल्याने सर्वाना धक्का बसला. महापालिको निवडणुकीत ‘एमआयएम’ व संविधान पार्टीने १३ जागा पटकावल्यानंतर चव्हाण यांनी महापौर-उपमहापौर व सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभापतिपदासाठी वेगवेगळ्या प्रवर्गातल्यांना संधी देऊन सोशल इंजिनिअरींगचा नवीन प्रयोग समोर आणला. स्थायीच्या सभापतिपदासाठी काँग्रेसने धबाले, तर शिवसेनेने नवाब यांना उमेदवारी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी आयोजित विशेष सभेत दोन्ही अर्जाची छाननी झाली. दोघांचे अर्ज वैध ठरल्यानंतर  निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोळा सदस्यांच्या समितीत काँग्रेसच्या ८ व राष्ट्रवादीच्या दोघांनी गबाले यांना हात उंचावून मतदान केल्याने त्यांना दहा मते मिळाली. नवाब यांना सेनेची ३ मते मिळाली. एमआयएमचे तिन्ही सदस्य या निवडणुकीत तटस्थ राहिले. सभापतिपदी निवडीनंतर धबाले यांचे जिल्हाधिकारी धीरजकुमार, महापालिका अतिरिक्त आयुक्त राम गगराणी यांनी स्वागत केले. कलामंदिर परिसरातून धबाले यांची मिरवणूक काढण्यात आली.