09 March 2021

News Flash

स्वसापळ्यात अडकलेलं धादांत खैरलांजी

वर्तमानात घडलेल्या एखाद्या निंद्य, निर्घृण सामाजिक घटनेबद्दल तात्काळ कलात्मक विधान करणं हे तसं धाष्टर्य़ाचं असतं.

| September 22, 2013 01:04 am

वर्तमानात घडलेल्या एखाद्या निंद्य, निर्घृण सामाजिक घटनेबद्दल तात्काळ कलात्मक विधान करणं हे तसं धाष्टर्य़ाचं असतं. त्यातही समाजातील बहुसंख्याक वर्ग (तोही सत्ता व सामाजिक उतरंडीत उच्च स्थानी असलेला!) त्यात गुंतलेला असेल आणि त्याचा रोष ओढवण्याची शक्यता असल्यास असं विधान करायला साहित्यिक व कलावंत मंडळी कचरतातच. म्हणूनच आपल्याकडे बाबरी मशिदीच्या पतनानंतर किंवा १९९३ च्या दंगलींवर रोखठोक वास्तव मांडणारं वा त्यावर परखड भाष्य करणारं नाटक मराठी रंगभूमीवर आलेलं नाही. या घटनांचे खोलवर गुंतलेले धागेदोरे, त्यांतली गुंतागुंत, त्या घटनेशी संबंधित अन्य तदनुषंगिक घटनांची पाश्र्वभूमी इत्यादीचं समग्रतेनं आकलन करून घेऊन त्यावर कलात्मक विधान करणं, हे तितकंसं सोपं नसल्याने असेल कदाचित; किंवा अशा घटनेवर भाष्य करून कुणाचा रोष वा वक्रदृष्टी पत्करायची तयारी नसल्याने म्हणा- असं होत असावं. अर्थात काही काळानं तरी अशा घटनांवरील कलाकृती यायला हरकत नसावी. पण तसंही अपवादानंच घडताना दिसतं. याला आपल्या सृजनशील मंडळींच्या मर्यादा म्हणायचं की कातडीबचावू वृत्ती? प्रश्नच आहे.  
या पाश्र्वभूमीवर आलेलं प्रज्ञा दया पवार यांच्या ‘धादांत खैरलांजी’ या नाटकाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. विशेषत: त्यांच्या कवितांतून व्यक्त होणारं तीव्र सामाजिक भान पाहता विशेषच. परंतु त्यांच्या या नाटकानं निराशा केली. नाटकातील नायकावर खैरलांजीतील घटनेत बळी गेलेल्यांनी जो आक्षेप (नाटकात) घेतला आहे, तोच आक्षेप या नाटकावरही घेता येईल. खैरलांजी प्रकरणावर भाष्य करण्याऐवजी किंवा त्या भयावह घटनेतलं दाहक वास्तव मांडण्याऐवजी नाटक भलतीकडेच भरकटलं आहे. नाटकाच्या शीर्षकातून व्यक्त होणारं ‘धादांत खैरलांजी’ नाटकानं खरं करून दाखवलं आहे.
प्रा. वैशाली आणि अमिताभ बनसोडे हे प्रखर सामाजिक भान असलेलं दाम्पत्य. ती स्त्रीमुक्ती चळवळीतली कार्यकर्ती. हाही एकेकाळचा दलित चळवळींतला कार्यकर्ता. आता कवी-लेखक. आंबेडकरी चळवळ, साहित्य आणि समाजावरील त्याची परखड मतं सर्वश्रुत असतात. त्यामुळे खैरलांजी प्रकरणावर चित्रपट बनवू इच्छिणारे बी. आनंदराज त्याच्याकडे पटकथालेखनाचा प्रस्ताव घेऊन येतात. चित्रपटात जातवास्तव मांडण्याकरता भोतमांगे कुटुंबातील बळी गेलेल्या मुलीचं सवर्ण मुलाशी प्रेमसंबंध होते- अशी जोड पटकथेला द्यावी असं त्यांचं म्हणणं असतं. त्यापूर्वी गावात झालेल्या एका खुनाचा संदर्भही त्यात असावा असा त्यांचा आग्रह असतो. यामागचा कावा प्रा. वैशालीच्या लक्षात येतो : हा माणूस खैरलांजीतील घटनेचं विपर्यस्त चित्रण करू मागतोय आणि त्यासाठी आपल्या नवऱ्याच्या आंबेडकरी समाज व चळवळीसंबंधातील बंडखोर मतांचा वापर करू पाहतोय! ती त्यांना विरोध करते. पण अमित तिला सबुरीनं घ्यायला सांगतो. ‘मी कुणाला आपला वापर करू देणार नाही.. तितका मी दुधखुळा नाही,’ असं म्हणून तो तिची समजूत घालतो.
दुसरीकडे प्रा. वैशालीनं कॉलेजात एका व्याख्यानादरम्यान वक्त्यांच्या मुस्लीम समाजासंबंधीच्या अनुचित वक्तव्यास आक्षेप घेतल्याने कॉलेज व्यवस्थापन तिच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करते. ती आपल्या भूमिकेचं हिरीरीने समर्थन करते. त्याचवेळी अकस्मात तिच्या आणि तिचा एकेकाळचा विद्यार्थी व आता सहप्राध्यापक असलेल्या प्रा. आकाश देशपांडे यांच्या कथित संबंधांबद्दलच्या कंडय़ा पिकवून तिला नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो. ती या बदनामीविरोधातही खंबीरपणे उभी राहते. परंतु पुढं परिस्थितीच असं वळण घेते, की आकाशचं होऊ घातलेलं लग्न व त्याची नोकरी वाचवण्यासाठी ती राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत येते. परंतु अमित तिला ‘काहीही झालं तरी हार मानू नकोस,’ असा सल्ला देत भक्कमपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. त्याचदरम्यान त्याच्या मनात येतं की, हेही एक प्रकारे ‘खैरलांजी’च आहे! आपल्या विरोधात जाणाऱ्यांना संपवायचं! चित्रपटात याही घटनेचा एक धागा गुंफून या दोन घटनांचा समांतरपणे वेध घेतला तर..? असं त्याला वाटतं. त्याकरता विवाहित प्रा. वैशाली आणि अविवाहित आकाश यांच्यातील कथित प्रेमसंबंधांचा वापर स्त्री-पुरुष संबंधांबाबतील नवी मांडणी करण्यासाठी तो करतो.
नाटकाच्या अखेरीस खैरलांजीत बळी गेलेले भोतमांगे कुटुंबीय त्याच्या या करणीला आक्षेप घेतात. त्याला भानावर आणतात. या दोन घटनांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण प्रा. वैशालीला कॉलेज प्रकरणातून वाचवण्यासाठी एका खासदाराची मदत होते. पण खैरलांजीत बळी गेलेल्यांना वाचवणारा कुणीच नसतो..
लेखिका प्रज्ञा दया पवार यांना ‘धादांत खैरलांजी’मध्ये आपल्याला नेमकं काय मांडायचं आहे, हे निश्चित करता आलेलं नाही. हे खैरलांजी प्रकरणावरचं नाटक म्हणावं तर त्यात त्याचे उल्लेख वगळता नाटक भलत्याच गोष्टींवर केन्द्रित झालं आहे. त्यातही वैचारिक व मांडणीतला गोंधळ आहे. प्रा. वैशालीनं अमितला चित्रपट निर्माते बी. आनंदराज यांच्या सापळ्यात अडकू नये म्हणून सावध केलेलं असतानाही तो जाणूनबुजून ती फिल्म स्वीकारतो. एकीकडे ‘मला जे म्हणायचंय तेच मी फिल्ममध्ये मांडेन,’ असं तो म्हणतो, परंतु चित्रपटाच्या करारावर मात्र डोळे झाकून सही करतो. पटकथेला प्रेमकहाणीची आणि स्त्रीमुक्तीची जोड देण्याच्या नादात आपण निर्मात्याला जे अपेक्षित आहे तेच करतो आहोत हे त्याच्या ध्यानातच येत नाही. प्रा. वैशालीही ते त्याच्या निदर्शनास आणून देत नाही. उलट, ते पार्टी सेलिब्रेट करतात. दुसरी खटकणारी बाब म्हणजे मूल्यांसाठी लढणारी वैशाली अखेरीस खासदारांच्या मदतीने आपली नोकरी वाचवते. यात तिला काहीच वावगं वाटत नाही? स्त्री-कार्यकर्त्यांनी कॉलेज मॅनेजमेंटविरोधात आंदोलन पुकारलेलं असताना वैशालीची नोकरी वाचवण्यासाठी खासदाराच्या हस्तक्षेपाची गरज का निर्माण व्हावी? सत्याचा, मूल्यांचा सतत घोष करणाऱ्या वैशालीला हे कसं काय चाललं? तिची नोकरी टिकली तरी तिने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचं काय? की ते तिनं सोडून दिले?
आणखीन एक : आधी विवाहाविना सहजीवन जगणाऱ्या वैशाली आणि अमितला असे कोणते तांत्रिक मुद्दे आड आले, की लग्न करणं त्यांना भाग पडलं? अमितच्या चित्रपटातील विवाहित नायिका प्रियकराशी खुलेआम संबंध ठेवण्याचं समर्थन करते. तिचं म्हणणं : ‘लग्न केलं म्हणून मी काही कुणाला माझ्या शरीराची मालकी दिलेली नाही.’ मान्य! स्वातंत्र्य म्हणजे शतप्रतिशत स्वातंत्र्य! व्यक्ती कुणाच्या मालकीची वस्तू नाही.. आणि असूच शकत नाही. पण मग कुटुंब, समाज नावाची गोष्टही निकालात काढावी लागेल. हा अत्यंत विवाद्य मुद्दा आहे. त्यावर अनेक कलाकृती निर्माण होऊ शकतात. बहुधा स्त्रीस्वातंत्र्याच्या या मुद्दय़ाची विवाद्यता लक्षात घेऊनच नाटकात नंतर त्यावर फार चर्चा करण्याचं टाळलं आहे. आणि अखेरीस खैरलांजीच्या बळींनी अमितला प्रश्न करण्यातून नाटक मूळ विषयाकडे आणलं आहे.
या झाल्या आशयातील काही गडबडी! याशिवाय नाटकाच्या मांडणीतही ढिसाळपणा आढळतो. चित्रपटाच्या एका दृश्यात वैशाली आणि आकाश यांच्यातलं प्रेमदृश्य दाखवलं आहे. त्यात आकाश तिला ‘मॅली’ म्हणतो. ‘मॅडम वैशाली’चा शॉर्टफॉर्म! पण चित्रपटातल्या त्या प्रसंगाविषयी आकाशच्या भावी बायकोला- वैष्णवीला सांगताना मात्र अमित ‘मॅक्ता’ असा चित्रपट नायिकेचा उल्लेख करतो. म्हणजे ‘मॅडम मुक्ता’ (पवार)! याला काय म्हणावं?
यातली पात्रं काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवली आहेत. विरोधी पात्रं हास्यास्पद करून दाखवण्यानं नाटकात ‘रीलिफ’ मिळत असला तरी नाटककर्त्यांनी ‘पोझ’ घेऊन नाटक रचलं आहे, हे त्यातून स्पष्ट होतं. चळवळीचं नाटक म्हणून ते क्षम्य आहे. परंतु मुळात नाटकाचा नेमकं ‘लक्ष्य’ काय, याबद्दलच प्रेक्षकाच्या मनात साशंकता निर्माण होत असेल तर नाटक कुठंतरी फसलंय.. निश्चित!
दिग्दर्शक शिवदास घोडके यांनी नाटकातील आशय व मांडणीतील या गोंधळासंबंधात लेखिकेशी चर्चा करून संहिता जास्तीत जास्त निर्दोष करून घ्यायला हवी होती. पण त्यांनी संहितेशी इमान राखत प्रयोग साकारला आहे. नाटकाचं नेपथ्य त्यात उच्चारल्या गेलेल्या पहिल्याच वाक्याशी फटकून असणारं आहे. नाटकात कॉफीपानाचे प्रसंग मुबलक आहेत. प्रयोगदृष्टय़ा ते खटकतं.
या नाटकातील लक्षणीय गोष्ट कुठली असेल, तर सर्व कलाकारांनी समरसून केलेली कामं! रेणुका बोधनकरांनी वैशालीचं वाक्पटुत्व, तिचं मूल्यांसाठीचं झगडणं, अन्यायाबद्दलची चीड प्रभावीपणे व्यक्त केली आहे. रांगडा, बंडखोर कार्यकर्त्यांच्या पिंडाचा लेखक अमिताभ बनसोडे.. अशोक केंद्रे यांनी त्याच्या सळसळत्या ऊर्जेसह उभा केला आहे. श्रीकांत सागर यांनी वरपांगी पुरोगामित्व मिरवणारा, परंतु अंतरी वेगळेच हेतू बाळगणारा चित्रपट निर्माता बी. आनंदराज यथातथ्य साकारलाय. आकाश झालेल्या अभिजीत श्वेतचंद्र यांनी त्याची झालेली गोची अचूक व्यक्त केली आहे. चेतन सुशीर (प्राचार्य सहस्रबुद्धे), मनाली जाधव (प्रा. माळीबाई) आणि रोचना मोरे (वैष्णवी) यांनी दिग्दर्शकाला अपेक्षित हास्यास्पद पात्रं चोख वठवली आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 1:04 am

Web Title: dhadhant khairlanji self traped marathi play
Next Stories
1 सरळ, साधा, हळुवार
2 अस्सल आणि धमाल नर्मविनोदी
3 आपल्यासाठीची ‘इन्व्हेस्टमेंट’
Just Now!
X