जुळ्या भावंडांच्या साम्यामुळे गाजलेला खमंग विनोदी ‘अंगूर’ हा सर्वाच्या लक्षात राहिलेला चित्रपट. त्याचप्रमाणे नामसाधम्र्यामुळे होणारी गंमतजंमत यावर अनेक चित्रपट, नाटके येऊन गेली आहेत. चित्रपटाचा हाच फॉर्म्यूला चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करताना देवेंद्र पेम यांनी वापरला आहे. हसवणुकीचा हा धमाल, पण ठरीव फॉर्म्यूला पडद्यावर मांडताना प्रेक्षकांची हसवणूक होते हे खरे असले तरी काही वेळा ही हसवणूक अति वाटण्याचा संभव आहे.
मधुर, मधुकर, मधु अशा नामसाधर्म्यामुळे उडालेला गोंधळ आणि घोळात घोळ यामुळे धमाल मनोरंजन हा चित्रपट नक्कीच करतो. मधुकर म्हणजे भरत जाधवला लग्न करायचे असेल तर नामांकित वकील व्हावे लागेल असे त्याची आई त्याला सांगते. आतापर्यंत एकही खटला कधीच जिंकू न शकलेला मधुकर ऊर्फ मधू आणि त्याचे बाबा म्हणजेच विनय आपटे जिंकणाऱ्या खटल्याचा शोध घेतात. हुकमी विजय मिळवून देणारा खटला शोधण्याऐवजी आधी मुलगी ठरव असे सांगितल्यानंतर मधुकर त्याची मैत्रीण मधु ऊर्फ स्मिता शेवाळेची निवड करतो. मग मधु ही प्रेरणा मानून धीर करून खटला लढवायचा आणि मधुला मिळविण्यासाठी झटायचे असे मधुकर ठरवितो. बाबांना एकदा मधुची भेट घडवून आणण्याचे मधुकर ठरवितो आणि मग एकामागून एक रंजक गोष्टी पडद्यावर घडत जातात आणि घोळात घोळ बघत प्रेक्षकाला हसू अनावर होते.
कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन अशा चार महत्त्वाच्या बाजू देवेंद्र पेम यांनी हाताळल्या आहेत. रूपेरी पडद्यावर पदार्पणातच या माध्यमाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलताना दिग्दर्शक-लेखक मागे पडला आहे. हंशा-टाळ्या घेणाऱ्या संवादांमुळे चित्रपट त्याच्या शीर्षकाला न्याय देत असला तरी अनेक ठिकाणी चित्रपट उगीचच लांबवला आहे, ताणला आहे असे जाणवते. नामसाधम्र्यामुळे झालेल्या घोटाळ्याची उकल करताना त्यातील व्यक्तिरेखांची एकमेकांशी असलेली जवळिक दाखविण्याचा यात अभाव आहे. उदाहरणार्थ, सुशीलाची मुलगी मधु केवळ सुशीलाच्या सांगण्यावरून मधुकरशी लग्न करायला तयार होते. परदेशात राहिल्यामुळे या मधुचे मराठी अस्खलित नसेल हे मान्य करता येते; परंतु चांगला या शब्दाला ती चक्क टांगला असे उच्चारते किंवा यांसारखे अनेक मराठी शब्दांचे भयंकर प्रकारे करते हे निश्चितच खटकणारे आहे. अतिरंजित कथानकाला अतिरंजित अभिनयाची जोड देण्याचा सर्वच कलावंतांनी प्रयत्न केला आहे. ‘कुंकू’सारखी मालिका केल्यामुळे प्रतिमेत अडकलेल्या मृण्मयी देशपांडेचा पडद्यावरचा सहज वावर यामुळे ती भाव खाऊन जाते. फार्सिकल विनोदाची फोडणी दिग्दर्शकाला जमली आहे; परंतु रुग्णालयातील दृश्याच्या वेळीही गमतीजमती करत नामसाधम्र्याच्या घोळामुळे निर्माण झालेल्या रहस्याची उकल दिग्दर्शकाला करता आली असती असे वाटते. सयाजी शिंदे यांनीही विनोदी भूमिका चांगली साकारली आहे. केतकी दवेची व्यक्तिरेखा, उदय टिकेकरची व्यक्तिरेखा या खूपच तकलादू आहेत. घोळात घोळ सादर करायचा आहे हे ठरविल्यानंतर त्याला अतिहसवणुकीच्या अट्टहासापायी नको इतका चित्रपट ताणला आहे. संकलनाची कात्री अनेक ठिकाणी लावून दिग्दर्शकाला आटोपशीर लांबीचा परंतु खमंग विनोदी चित्रपट निर्माण करणे शक्य होते. तरीसुद्धा हा चित्रपट निखळ हसण्याची संधी प्रेक्षकाला भरपूर देतो.
धामधूम
अनामय प्रस्तुत
निर्माता- रवींद्र वायकर
दिग्दर्शक- देवेंद्र पेम
कथा-पटकथा-संवाद- देवेंद्र पेम
छायालेखन- राजा सटाणकर
संकलन- आनंद दिवाण
संगीत- अवधूत गुप्ते
गीते- गुरू ठाकूर
कलावंत- भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, सयाजी शिंदे, आनंद अभ्यंकर, मेघना वैद्य, मुग्धा शहा, उदय टिकेकर, आसावरी जोशी, अश्विनी आपटे, विनय आपटे, केतकी दवे.