२७६, रावसाहेब फडणवीस, त्रिकोणी पार्क, धरमपेठ, नागपूर.. पत्ता जुनाच, पण या पत्त्याला आता नवी झळाळी प्राप्त होत आहे. सर्वसामान्यांचा देवेंद्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याबरोबर या निवासस्थानाकडे येणारे सर्व रस्ते नव्याने तयार होत आहे. गुरुवार, ३० ऑक्टोबरपासूनच या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. २ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रस्ते सज्ज करण्याचे आदेश देण्यात आल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातील २० भटक्या कुत्र्यांना कैदेत टाकण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेने दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच नागरिकांचीही हाडे खिळखिळी केली असतानाच उपराजधानीतल्या मुख्यमंत्र्यांमुळे शहरातील रस्त्यांचेही भाग्य पलटले आहे. एरवी विनंती करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारी महापालिका आता मात्र तातडीने कामाला लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठेतील रस्त्याचे काम गुरुवारपासूनच सुरू झाले. गोकुल वृंदावनापासून तर देवेंद्र फडणवीसांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे.
येत्या २ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात येणार असल्याने, साहजिकच त्यांचा ताफाही सोबत असणार आहे. त्यांना कोणतीही अडचण जाऊ नये म्हणून तातडीने हे काम हाती घेतल्या गेले.
यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवले. त्यांना विचारले असता महापालिकेकडूनच हे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या चकाकीसोबतच गुरुवारी सकाळपासूनच धरमपेठ, गोकुलपेठ, भाजी बाजार, वेस्ट हायकोर्ट या परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. तब्बल २० कुत्र्यांना या कर्मचाऱ्यांनी कैद केले. या उपक्रमामुळे मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरातील नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.