श्री शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री महानगड ते श्री रायगडमार्गे पुण्यश्लोक जिजामाता समाधी (पाचाड) अशी धारातीर्थ यात्रा (मोहीम) उद्यापासून (बुधवार) शनिवापर्यंत (दि.५) आयोजित केली आहे. मोहिमेच्या समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानने कळवले आहे.
श्री शिवप्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की स्वातंत्र्य मिळून सहासष्ट वष्रे लोटली तरीही हिंदू समाज मनाने पारतंत्र्यात राहिला आहे. कर्तृत्ववान, शीलवान, धर्यवान, साहसी, त्यागी, संयमी, प्रखर स्वदेशाभिमानी व स्वधर्माभिमानी, उगवत्या तरुणांची पिढी, ही राष्ट्राची खरी मूलभूत संपत्ती आहे. या कसोटीवर हिंदुस्थान आजही दरिद्रीच आहे. सध्याच्या अध:पतित अवस्थेतून उगवत्या तरुण पिढीला ध्येयवादी बनविण्यासाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवप्रभूंच्या अत्यंत स्फूर्तिप्रेरणादायक जीवनाचा न पुसला जाणारा खोल ठसा त्यांच्या चित्तात उमटवणे अत्यंत अत्यावश्यक आहे. यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, त्यास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी (दि. २) निजामपूर (ता. माणगाव, जि. रायगड) हे मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळ माणगाव येथून ७ किलोमीटर अंतरावर गाव आहे. तेथून सकाळी ६ वाजता तुळजामातेच्या आरतीने मोहिमेला प्रारंभ होणार आहे. रविवारी (दि. ५) मोहिमेचा समारोप होणार आहे.