मागच्या काही वर्षांत राजकारणी व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या संस्कृतीला आणलेले मागासलेपण पुसण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. सार्वजनिक उत्सवात तरी आशादायक चित्र असून त्याची सुरुवात ढोल-ताशांच्या पथकातून होऊ लागली आहे. नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ‘नगरचा राजा रुद्रनाद’ पथकाने नुकतीच शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीपुढे पहिली मानवंदना देऊन या उपक्रमाचा श्रीगणेशा केला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन हे पथक तयार केले असून, शहरात या वर्षी स्थापन झालेले हे शहरातील दुसरे ढोल-ताशा पथक आहे. ग्रामदैवतासमोर तब्बल तासाभराची मानवंदना देण्यात आली. ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेता सौरभ गोखले याच्यासह देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, गुरव तबलेवाले या दालनाचे संचालक  गुरव, ओम गार्डनचे संचालक बाळासाहेब पवार, श्रीकांत वैद्य, क्षितिज झावरे, अमोल खोले आदी या वेळी उपस्थित होते.
पुष्कर शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सध्या २५ ढोल व ५ ताशे आहेत. ताशाच्या पहिल्या काडीपासून सुरू झालेला हा नादप्रवास दोन आवर्तने, रुद्रनाद स्पेशल आणि मग नाशिक ढोल असा उंचावत गेला. त्याला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी आगरकर यांनी या मुलांच्या उपक्रमाचे कौतुक केले. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात या पथकामुळे भर पडली असून, संस्कृती जतनाबरोबरच पारंपरिक वाद्यांच्या कर्णमधुर नादाचा आत्मिक आनंद नगरकर घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यातून डीजे-सीडीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला आळा बसेल असे ते म्हणाले.
सौरभ गोखले यांनीही या संस्कृती जतनाला शुभेच्छा दिल्या. अॅड. पुष्कर तांबोळी, स्वप्नील मुनोत, अवधूत गुरव, प्रतीक झरकर, रोहित झरकर, विनीत झरकर, प्रशांत मुनफन, रोहित पोकळे, ओंकार गीते, रोहन पठारे, हेमंत सुद्रिक, दीपा चोपडा, पराग जोशी, सागर ठाकूर, प्रसाद खांडत, ओंकार ठाकूर यांचा या पथकात समावेश आहे. इच्छुकांना पथकात प्रवेश देण्यात येत असून अशांनी ९८६०५३४४१४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन पथकाचे प्रसिद्धिप्रमुख शरद सुद्रिक यांनी केले आहे.