दुकानात मोबाईल खरेदी करताना संच दाखवणारा तरूणच महिलेच्या गळ्यातील दागिने धूमस्टाईलने चोरत होता. त्याला एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने ओळखले. पोलिसांना त्याची माहिती दिली, त्यामुळे पाच सोनसाखळी चोरांची टोळीच पोलिसांच्या हाती लागली. टोळीत काही विद्यार्थी असून त्यांनी तीन चोऱ्यांची कबुली दिली.
धूमस्टाईल दागिन्यांच्या चोऱ्या करून मौजमजा करण्याचे काम हे तरूण करत होते. टोळीतील एक आरोपी हा तंत्रनिकेतनमध्ये पहिल्या वर्षांला तर दोघे व्यावसायिक आहेत. चोरीचे सोने विकून महागडे मोबाईल घेणे, हॉटेलमध्ये पाटर्य़ा झोडणे, चांगल्या कपडय़ांची खरेदी करणे अशा मौजमजेवर ते पैसे उडवत होते. पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, उपनिरीक्षक भारत बलैय्या यांनी अत्यंत कौशल्याने टोळीचा तपास करून अवघ्या अडीच तासात आरोपींना अटक केली. त्यांच्याकडन चोरीस गेलेले सोनेही हस्तगत केले.
पोलिसांनी सलमान अस्लम मलिक (वय १९, रा. आदर्शनगर), सचिन दिलीप तोडकर (वय २३), विक्रम चंद्रकांत खरोटे (वय १९) व समिर अन्वर शेख (वय २०, रा. संतलुक रूग्णालय परिसर), रियाज शफिक शेख (वय २३, रा. स्मशानभूमी परिसर)यांना अटक केली.
गेल्या रविवारी सरस्वती वसाहतीनजिक एक महिला आपल्या भाचीसमवेत फिरायला चालल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या तिघा तरूणांनी महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून धूम ठोकली. पण महिलेसोबत असलेल्या भाचीने एका आरोपीला ओळखले. बारावीच्या वर्गात शिकणारी ही विद्यार्थीनी रेल्वेस्थानक परिसरातील एका मोबाईलच्या दुकानात गेली. त्यावेळी तिला मोबाईल संच दाखविणारा तरूण हाच दागिने चोरांबरोबर असल्याचे तिला दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या अडीच तासात हा गुन्हा उघडकीला आणला.