News Flash

धुळे महापालिकेतील कर्मचारी संपावर

कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्याऐवजी महापालिका प्रशासन ठेकेदारांना लाखो रुपये वितरित करत असल्याच्या निषेधार्थ कर्मचारी समन्वय

| January 9, 2014 07:56 am

कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्याऐवजी महापालिका प्रशासन ठेकेदारांना लाखो रुपये वितरित करत असल्याच्या निषेधार्थ कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या संपामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. अचानक सुरू झालेल्या आंदोलनाचा विपरित परिणाम मूलभूत सोई-सुविधांवर होण्याची भीती शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे. काही महिन्यांपूर्वी तर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेही पालिकेला शक्य झाले नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अनुसरला. अखेर काही महिन्यांनी वेतन फरकाची रक्कम आणि इतर अतिरिक्त भत्ते वगळता दिली गेली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकलेली रक्कम आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन ही देणी दिल्याशिवाय विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची देयके दिली जाणार नसल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने कर्मचारी समन्वय समितीला दिले होते. परंतु, हेच आश्वासन प्रशासनाने पाळले नसल्याचा आरोप समन्वय समितीने केला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेने ११ लाखांची देयके काढली. ही देयके परस्पर काढण्यात काढली जात असल्याचे निदर्शनास आले आणि त्यामुळे संतप्त कर्मचारी समन्वय समितीने संपाचे हत्यार उपसले. लेखी आश्वासन देऊनही प्रशासनाने कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. लेखी आश्वासन देऊनही ठेकेदारांची लाखो रुपयांची देयके काढण्यात आल्याची तक्रार समितीचे बगदे यांनी केली. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त के. व्ही. धनाड यांना जाब विचारला असता त्यांनी आपणास काही माहिती नाही असे सांगून कानावर हात ठेवले. हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने होत असून कामगारांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप समन्वय समितीने केला आहे. या पाश्र्वभूमीवर, बुधवारपासून कर्मचाऱ्यांनी अचानक संप सुरू केला. बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 7:56 am

Web Title: dhule corporation employees on strike
Next Stories
1 अनुदानित १२ सिलिंडर देण्याची ग्राहक पंचायतीची मागणी
2 नाशिक तालुका क्रीडा संकुलाचे आज भूमिपूजन
3 नाशिकसाठी किकवी प्रकल्प अत्यावश्यक
Just Now!
X