मूत्रिपडाच्या विकारामुळे डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांना मुंबईच्या गर्दीतही प्रवास करणे सोपे जावे, यासाठी आता बेस्ट प्रशासनाने या रुग्णांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. दर काही दिवसांनी डायलिसिस प्रक्रिया करावी लागत असल्याने या रुग्णांना अशक्तपणा आला असतो. त्यात त्यांना बेस्टच्या गर्दीत धक्के खावे लागू नयेत, यासाठी आता बेस्टने या रुग्णांना थांब्यांवर पुढील दरवाजाने विनासायास चढण्याची सूट दिली आहे. त्याचप्रमाणे अंध व अपंग यांच्यासाठी राखीव असलेल्या आसनांवर कोणी बसले नसेल, तर या रुग्णांना तेथे बसण्यासाठी प्राधान्य देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये डायलिसिसवर असलेले अनेक रुग्ण आहेत. हे रुग्ण इतर वेळी आपले दैनंदिन काम करू शकतात. मात्र डायलिसिसवर असल्याने त्यांना अशक्तपणा येतो. तसेच अनेकदा डायलिसिससाठी त्यांच्या शरीरात सुईसारखे घटकही टोचले असल्याने गर्दीत त्यांना धक्का लागल्यावर प्रचंड त्रास होतो. असे काही रुग्ण आपली तक्रार घेऊन बेस्ट समिती सदस्य केदार होंबाळकर यांच्याकडे आले.
या रुग्णांचे म्हणणे ऐकल्यावर त्यांना सवलत द्यायला हवी, असे वाटले. त्यामुळे होंबाळकर यांनी बेस्ट समितीच्या बठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे हा प्रस्ताव मांडला. डायलिसिसच्या रुग्णांना बसमध्ये पुढील दाराने चढण्याची मुभा द्यावी, तसेच त्यांना अपंग व अंध यांच्यासाठी राखीव असलेल्या आसनांवर इतर वेळी बसण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी सूचना होंबाळकर यांनी मांडली.
बेस्ट समिती अध्यक्ष अरिवद दुधवडकर यांनी या हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे मांडलेल्या सूचनेचे स्वागत करत ही सूचना तातडीने संमत केली. त्यामुळे आता बेस्टच्या बसगाडय़ांमध्ये डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना प्राधान्य मिळणार आहे.