पतीचा शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडणे, तपासात मृतदेह ताब्यात घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी पत्नीचा मृतदेह सापडणे, या प्रकरणी संशयास्पद सहभाग उघड झाल्यावर पोलीस निरीक्षकाला झालेली अटक यामुळे पती-पत्नीच्या मृत्यूचा तपास गुंतागुंतीचा झाला असतानाच मयत पुरुषाच्या वडिलांनी सोमवारी विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेने एकूणच या प्रकाराला नव्याने कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून, पोलिसांपुढे तपासाचे नवेच आव्हान निर्माण झाले आहे.
कळमनुरी तालुक्यातील गोर्लेगाव येथील प्रकाश खंडुजी झुंगरे याचा शिर नसलेला मृतदेह विहिरीत आढळून आला. पोलिसांनी झुंगरेचा शिर नसलेला मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत प्रकाशच्या पत्नीचा मृतदेह कुपटी शिवारात सापडला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक तोटावार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गेल्याच आठवडय़ात न्यायालयापुढे शरण आल्यावर तोटावार याला अटक झाली. काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. दुहेरी खुनाचे गूढ उकलण्यात पोलीस अपयशी ठरत असतानाच सोमवारी प्रकाशच्या वडिलांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. मात्र, या घटनेमुळे दुहेरी खुनाच्या प्रकरणाला नाटय़मय कलाटणी मिळाली आहे. एकूणच हे प्रकरण चांगलेच गुंतागुंतीचे होत चालले असल्याचे पाहावयास मिळत आहे.
प्रकाश झुंगरेचा शिर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर आखाडा बाळापूरचा पोलीस निरीक्षक विकास तोटावार याने मृत प्रकाशची पत्नी सुशीलाबाई हिला तपासासाठी ताब्यात घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी सोडून दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुपटी शिवारात झाडाला सुशीलाबाईचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रकाशचा मृतदेह पुरण्यासाठी त्याचे वडील खंडुजी झुंगरे यांनी खड्डा खोदला, असे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी प्रकाशच्या वडिलांविरुद्ध पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली २० डिसेंबरला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. तीन महिन्यांनंतर नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. सुशीलाच्या मृत्यूस कारण ठरल्याच्या आरोपाखाली कार्तिक कुरुडे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्याचा निरीक्षक विकास तोटावारविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दि. २३ एप्रिलला तोटावार हिंगोली न्यायालयात शरण आल्यावर त्याचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला.