लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार सुभाष वानखेडे यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित झाल्यानंतर ते शुक्रवारी हिंगोली येथे आले. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष मिनाक्षी बोंढारे, उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे ही मंडळी गैरहजर असल्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाटय़ावर आली.
लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षातून शिवसेनेत आलेले डॉ. बी. डी. चव्हाण उमेदवारी मिळावी यासाठी खटपट करीत होते. त्यांना माजी आमदार घुगे आणि मुंदडा यांची साथ आहे. चव्हाण हेच लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असतील, असे वातावरण घुगे आणि मुंदडा समर्थकांनी करून ठेवले आहे. मात्र वानखेडेंच्या फेरनियुक्तीमुळे त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडले. बैठकीला उपस्थित न राहण्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाटय़ावर आली. दोन माजी आमदार आणि खासदार यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या अनुषंगाने बोलताना घुगे म्हणाले की, ‘अद्याप उमेदवार ठरलेला नाही. शिवसेनेचा उमेदवार दैनिक सामनामधून जाहीर होतो. निवडणून येणाऱ्या व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे’.