दैनंदिन आयुष्य जगताना स्वत:चा हेका गाजवणाऱ्यांची वाट इतरांपेक्षा वेगळीच असते, परंतु त्यांचा उद्देश आपले वेगळेपण दर्शवण्याचा नसून ते स्वत:च्या आनंदासाठी वाट बदलतात. यामुळे त्यांचे वेगळेपण दृष्टीस पडते. अशाच प्रकारचा ‘वेगळ्या वाटा’ हा मुक्तसंवाद साधणारा कार्यक्रम सप्तक व छाया दीक्षित वेलफेयर फाऊंडेशनतर्फे लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात नुकताच पार पडला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात कितीतरी संशोधनातून आरोग्यसेवा पुरवण्याचा ध्यास घेणारे शोधग्रामचे संस्थापक डॉ. अभय बंग, पुण्यात मोठय़ा हॉस्पिटलचे स्वप्न पाहणारे व संगीतक्षेत्रात आलेले डॉ. सलील कुळकर्णी तसेच संगीत व अभियांत्रिकीचा जोड मिळवून हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी ठसा उमटवणारे विजय दयाळ यांनी ‘वेगळ्या वाटा’मध्ये स्वत:तील कर्तृत्वपूर्ण अनुभव प्रेक्षकांसमोर सांगितले. तिघांच्याही अनुभवाचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. इतरांप्रमाणे अमेरिकेत न जाता आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच देशात व्हावा, यासाठी मान मिळवून देणारे पद व भक्कम पैसा सोडला, असे मत यावेळी डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
केवळ सेवा नव्हे तर संशोधनाचे महत्त्व सांगणारे विचार प्रत्येकाला हालवून सोडणारे होते. १३ वर्षांंचा असताना घेतलेला आरोग्यसेवेचा वसा पाळल्याचे समाधान डॉ. बंग यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
मराठी ठसा उमटवण्याची जिद्द पूर्ण केल्याचे समाधान विजय दयाळ यांच्या चेहऱ्यावर दिसत होते, तर पैशापेक्षा स्वत:ला आनंद देऊ करणाऱ्या क्षेत्रात असल्याचा मान डॉ. सलील कुळकर्णी यांच्या देहबोलीवरून जाणवत होता. कार्यक्रमाच्या निवेदिका रेणुका देशकर होत्या.