तालुक्यातील ममदापूरकरांसाठी संजीवन ठरणारा मेळ बंधाऱ्यास जलविज्ञान विभागाने पाणी उपलब्धतेचा दाखला नुकताच दिल्याने या प्रकल्पातील प्रमुख अडचण दूर झाली आहे.
गिरणा नदीवरील मेळ या बंधाऱ्यासाठी ममदापूरकरांनी २५ वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. २००४ मध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वचननाम्यात समाविष्ट असलेला हा बंधारा वन खात्यामुळे रेंगाळला होता. तसेच तापी खोऱ्यात पाणी उपलब्ध नसल्यानेही विभागाकडून पाणी उपलब्धतेचा दाखला मिळू शकला नाही. याबाबतीत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.
मात्र तापी खोऱ्यातील इतर प्रकल्पातील पाणी क्षमतेपेक्षा कमी अडविले गेल्याने योजनेस मंजुरी मिळाल्याचे कळते. जलविज्ञान विभागाने आपल्या प्रमाणपत्र उपलब्धतेसाठी येवला तालुक्यातील पर्जन्यमानाचा संदर्भ घेतला असून या बंधाऱ्यामुळे मन्याड नदीवरील माणिककुंज धरणाच्या क्षमतेवर विपरित परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.
लवकरच या बंधाऱ्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून योजना कार्यान्वित होण्याच्या दृष्टिने पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती येथील संपर्क कार्यालयातील बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.