नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा विभाग कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विभाग कार्यालयाची इमारत मागील काही वर्षांत डागडुजी करण्यात न आल्याने जीर्ण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारतीची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आलिशानपणे उभे ठाकले आहे; परंतु त्याची पाळेमुळे असणाऱ्या विभाग कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दिघा विभाग कार्यालय हे सर्वात जुने कार्यालय आहे. १९९५ साली संजीव नाईक महापौर असताना ही इमारत उभारण्यात आली होती. मागील २० वर्षांत या इमारतीची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. दुमजली कार्यालयाच्या इमारतीत अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने दुसऱ्या मजल्यावर टेबल मांडून अधिकारी बसले आहेत. तर प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे छप्पर गळके झाल्याने पावसाळ्यात त्यातून पाणी झिरपते. पहिल्या मजल्यावर करभरणी आणि जन्म-मृत्यू दाखले वाटप खिडकी आहे. करभरणी विभागातील कार्यालयाचे छत कोसळून या ठिकाणच्या महिला कर्मचाऱ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर या ठिकाणी थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. सदर ठिकाणचे छप्पर कधीही कोसळून एखादी जीवितहानीची घटनादेखील होऊ शकते, तर विभाग कार्यालयाच्या इमारतीत सर्वच ठिकाणी पावसाळ्यात पाणी झिरपत असल्याने कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या छताचे आवरण घालून काम करावे लागते. इमारतीच्या बाहेरील कॉलम जीर्ण झाले असून ते कधीही कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या विभाग कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकरिता तसेच आढावा घेण्यास आलेल्या लोकप्रतिनिधीकरिता बसण्याची साधी स्वतंत्र आसनव्यवस्था नाही. त्यामुळे हे विभाग कार्यालय आहे की एखादे सार्वजनिक ठिकाण अशी अवस्था झाली आहे. या विभाग कार्यालयातील शौचालयाची देखील अवस्था अत्यंत बिकट आहे. जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने ते साहित्य कर्मचारी बसतात त्याच ठिकाणी ठेवण्यात येते. त्यामुळे आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रकाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विभाग कार्यालयात अनेक कामासाठी नागरिक येतात; परंतु त्यांना बसण्याची आसनव्यवस्था नाही. तर कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयीसुविधांची देखील वानवा असल्याने नागरिकांनी या विभाग कार्यालयाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे. विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पालिकेने या इमारतीची किमान डागडुजी तरी करावी, अशी कैफियत मांडली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक, विभाग अधिकाऱ्यांची गाडी, इतर शोधपथकांच्या गाडय़ा या कार्यालयाच्या बाहेरील जागेत रस्त्यावरच पार्क केल्या जातात. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने या ठिकाणी गर्दीचा सामना कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना करावा लागतो.

विभाग कार्यालय हे सर्वात जुने आहे. या कार्यालयाची पुनर्बाधणी करून ३ ते ४ मजली कार्यालय उभारल्यास नागरिकांना विविध केंद्रांच्या माध्यमातून लाभ घेता येईल. तर पालिकेच्या इतर एखाद्या अधिकाऱ्यावर छत कोसळून होणारी आपत्ती डागडुजी केल्यास टळेल.
प्रदीप बोरकर, नागरिक

विभाग कार्यालयाची इमारत खचली आहे. त्याचबरोबर या ठिकाणचे छतदेखील जीर्ण झाले आहे. याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.
गणेश आघाव, दिघा विभाग अधिकारी