येथील उपनगराध्यक्षपदी अखेर आज दिलीप नागरे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्येकी ६ महिने संधी दिली जाईल, असे आश्वासन नगरपालिकेचे सूत्रधार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिले आहे.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता दिलीप नागरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना संजय फंड हे सूचक होते तर अण्णासाहेब डावखर हे अनुमोदक आहे. यावेळी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर शेख, अंजुमभाई शेख, श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, सलीम शेख, श्याम आडांगळे, संजय छल्लारे, कलीम शेख यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदासाठी नागरे यांचे नाव पक्षप्रतोद संजय फंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावून धरले होते. उपनगराध्यक्षपदासाठी नागरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे हेही इच्छुक होते. परंतु सकाळी पालिकेचे सूत्रधार जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, राजन भल्ला, जगजितसिंग चुग, आदींच्या उपस्थितीत इच्छुकांशी चर्चा होवून त्यानंतर एकमताने नागरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
उपनगराध्यक्षपदी निवड झालेले दिलीप नागरे हे सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष असून १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. उपनगराध्यक्षपदासाठी संजय छल्लारे यांचे नाव निश्चित झाले होते. पण एका गटाने नागरे यांचे नाव पुढे रेटले त्यामुळे छल्लारे यांचा नावाचा फेरविचार करावा लागला. पालिकेच्या राजकारणात २५ वर्षांत प्रथमच ससाणे यांच्यावर नाव बदलण्याची वेळ आली. उपनगराध्यक्ष पदासाठी ससाणे यांनी अंजुम शेख यांना विचारणा केली होती. पण त्यांनी नकार दिल्याने छल्लारे, नागरे, अण्णासाहेब डावखर आदी उत्सुक होते. नागरे यांच्या नावाचा आग्रह पक्षप्रतोद संजय फंड यांनी धरला. त्यांना यश आले. ससाणे यांनी पालिकेच्या कारभाराची जबाबदारी फंड यांच्यावर टाकलेली आहे. यापुढेही तेच कारभार पाहतील याचे संकेत आजच्या निवडीने मिळाले.