नूतनीकरणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहाची अवघ्या दहा ते अकरा महिन्यांत दैन्यवस्था झाली आहे. नाटय़गृहाच्या दैन्यवस्थेवर निर्माते, अभिनेते आणि प्रेक्षकही नाराज असून नाटय़गृहातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी अपेक्षा नाटय़ व्यावसायिक आणि रसिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाटकाची प्रॉपर्टी वर नेण्यासाठी दीनानाथ नाटय़गृहात असलेले उद्वाहन गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहे. त्यामुळे प्रॉपर्टी थेट वर नेण्यात अडचणी येत असून जिन्यावरून ती वर न्यावी लागत आहे. नाटय़गृहात प्रवेश करण्याकरिता काही पायऱ्यांचा जिना आहे. या जिन्याच्या खाली मोठय़ा गोणी ठेवण्यात आल्या आहेत. नाटय़गृहाच्या नूतनीकरणाच्या वेळेस काही कामासाठी येथे एक शेड उभारण्यात (कंटेनर) उभारण्यात आली होती. ही शेड अद्याप तेथे असल्याने वाहने उभी करण्यात अडथळा येत आहे. ही शेड हलवली तर मोकळ्या झालेल्या जागेत काही दुचाकी/चारचाकी वाहने उभी करता येऊ शकतील. रंगमंचावर उभ्या करण्यात आलेल्या विंग नाटय़ व्यावसायिकांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. त्या बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी सांगितले.

नाटय़गृहात दोन कॉन्फरन्स हॉल तयार करण्यात आले आहेत. नाटकाच्या तालमी किंवा नाटकाशी संबंधित चर्चा करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. मात्र नाटय़गृह सुरू झाल्यापासून त्याचा वापर करण्यात आलेला नाही. नाटय़गृहातील प्रसाधनगृह व अन्य एक-दोन ठिकाणी छताचे पोफडे निघाले आहेत. रंगभूषा कक्षात (महिला कलाकार)असलेल्या वातानुकूलित यंत्राचे आच्छादनही निघालेले आहे. नाटय़गृहातील त्रुटी आणि दैन्यवस्थेबाबतची कल्पना वेळोवेळी नाटय़गृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. नाटय़गृहाची देखभाल/दुरुस्ती करण्याची जबाबदारी अद्याप संबंधित कंत्राटदारावर असून त्याची मुदत ३१ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्याअगोदर संबंधित कंत्राटदाराकडून या त्रुटी दूर करून घेण्यात याव्यात, अशी मागणीही जाधव यांनी केली.

दरम्यान या संदर्भात नाटय़गृहाचे व्यवस्थापक संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या सर्व त्रुटी आपण उपप्रमुख अभियंता इमारत बांधकाम-पश्चिम उपनगरे यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचविल्या आहेत.