पश्चिम उपनगरातील बृहन्मुंबई महापालिकेचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहाचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात १ ऑगस्ट रोजी हे नाटय़गृह रसिकांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे. दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी गेली काही वर्षे हे नाटय़गृह बंद होते.
 नाटय़गृह गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने रंगकर्मी आणि रसिकांची मोठी गैरसोय झाली होती. बंद असलेल्या नाटय़गृहाच्या नूतनीकरणाबाबत ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी बातम्या देऊन पाठपुरावा केला होता. महापौर सुनील प्रभू यांनी शनिवारी महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसह नाटय़गृहाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर महापौरांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या मुलुंड येथील कालिदास नाटय़गृहाचे तसेच गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्रातील नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असेही महापौर म्हणाले. मुंबईकरांना अधिकाधिक नाटय़गृहे उपलब्ध व्हावीत, त्यासाठी भांडुप, गोरेगाव, घाटकोपर-कुर्ला येथील नाटय़गृहासाठी आरक्षित असलेली जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर लवकरच तेथे नवीन नाटय़गृहांच्या कामाला सुरुवात होईल, असेही महापौरांनी या वेळी सांगितले.