जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी दिलेल्या सासू व सुनेवर चार अस्वलांनी जीवघेणा हल्ला करून सासूच्या शरिराचे लचके तोडून सुनेलाही जखमी केले.
घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याअंतर्गत पाटापांगरा येथील विमल उल्हास राठोड (५२) आणि तिची सून रंजना संतोष राठोड (२८) या दोघी जंगलात अगदी पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या. पाटापांगराच्या जंगलातील चित्रऋषी महाराज मंदिराजवळ चार अस्वलांनी या सासू-सुनेवर जबर हल्ला केला. सासू  विमलवर झालेला हल्ला अतिशय भयंकर व जीवघेणा होता. विमलची सून रंजनाही या हल्ल्यात जखमी झाली. घटना घडली तेव्हा बाजूने जाणाऱ्या एका वाहनातील लोकांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मिळेल त्या साधनाने अस्वलांच्या तावडीतून या दोघींची सुटका केली. त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच अनेक नागरिकांनी वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जि.प. माजी सभापती देवानंद पवार, आमदार वामनराव कासावार, साहेबराव पवार  इत्यादींसह वन, महसूल आणि पोलीस खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन सासू विमल आणि सून रंजना यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वन विभागाचे अधिकारी पाटापांगऱ्याच्या ४० किलोमीटर पसरलेल्या जंगलात त्या अस्वलांचा शोध घेत आहेत.