हवाई नकाशावर नाशिकला स्थान मिळावे असे प्रयत्न वारंवार होत असले तरी आणि नाशिक-मुंबई विमानसेवेचे प्रयोग आधी अनेकदा अयशस्वी झाल्याचा इतिहास असताना विमान कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार नाशिकहून थेट विमानसेवा आर्थिकदृष्टय़ा परवडणारी नसल्याचे पुढे आले आहे. परिणामी ९० कोटीहून अधिक निधी खर्चून उभारलेल्या ओझरच्या विमानतळावरून नाशिक ते मुंबई अशी थेट विमानसेवा सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. या पाश्र्वभूमीवर ना नफा- ना तोटा या धर्तीवर विमान कंपन्यांना ‘मोनो मेट्रो सिरीज एअर कनेक्टिव्हिटी’साठी सक्ती करावी असा प्रयत्न करण्यात येत आहे. दोन बडय़ा शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेच्या मार्गात नाशिकला तात्पुरता थांबा देणे हा एकमेव पर्याय आता शिल्लक आहे.
नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी हवाई मार्गाने ते देशातील इतर शहरांशी जोडणे आवश्यक आहे. देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या नाशिकमधून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रदीर्घ काळापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या अखत्यारीतील ओझर विमानतळाचा राज्य शासनाने विकास केला. प्रवासी इमारत बांधण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. लोकसभा निवडणुकीआधी त्याचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यामुळे या विमानतळावरून प्रवासी विमान उड्डाण घेईल अशी आशा पल्लवित झाली. मात्र सव्वा वर्षांत तसे काहीच घडले नाही. उलट मध्यंतरी, प्रवासी (टर्मिनल) इमारतीच्या भाडय़ाच्या मुद्दय़ावरून राज्य शासन आणि एचएएलमध्ये वादंग निर्माण झाले. हा वाद संपुष्टात आला असला तरी विमानतळावरून लवकर प्रवासी विमान उड्डाण घेईल याची शाश्वती नाही.
प्रवासी इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर विमान कंपन्यांनी नाशिकहून विमानसेवा सुरू केल्यास कितपत प्रतिसाद मिळेल याचा सर्वेक्षणाद्वारे अभ्यास केला. देशांतर्गत प्रवासासाठी नाशिकहून दररोज सरासरी ६०० नागरिक मुंबईला जातात. त्यातील २० टक्के नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावयाचा असतो. मुंबई गाठण्यासाठी संबंधितांकडून १५ टक्के सार्वजनिक प्रवासी वाहने, ३० टक्के वैयक्तिक वाहने, तर ५० टक्के कुल कॅब अर्थात टॅक्सी तर ५.५ टक्के नागरिक रेल्वेचा वापर करतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मुंबईला जाणाऱ्यांमध्ये ५० टक्के कॉर्पोरेट क्षेत्रातील, तर २० टक्के शासकीय व्यक्तींचा समावेश आहे. नाशिकहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या सरासरी ६०० इतकी आहे. नाशिकहून ८० किलोमीटरवर असणारे शिर्डी हवाई वाहतुकीसाठी उपयुक्त ठरू शकते. शिर्डीला देशभरातील भाविक दाखल होतात. यामुळे पुणे-दिल्ली, हैदराबाद-पुणे, बंगलोर-पुणे या महानगरांमधील विमानसेवेत नाशिकला समाविष्ट केल्यास काही अंशी लाभ होऊ शकतो असा निष्कर्ष पुढे आला. तुलनेत मुंबईला वैयक्तिक वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. त्यातून नाशिक-मुंबई विमानसेवेसाठी किती प्रवासी उपलब्ध होतील याबद्दल विमान कंपन्या साशंक आहेत. यामुळे नाशिक-मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्यास त्या तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी त्यास दुजोरा दिला. थेट विमानसेवा सुरू होण्यास अडचणी असल्या, तरी आपण मेट्रो सिटी आणि नॉन मेट्रो सिटी यांच्या हवाई मार्गे जोडणीसाठी ना नफा- ना तोटा तत्त्वावर मोनो मेट्रो सिरीज एअर कनेक्टिव्हिटीची संकल्पना राज्य शासनासमोर मांडली आहे. शासन विमान कंपन्यांना हमी देऊन ही विमानसेवा सुरू करण्याची सक्ती करू शकते. शिवाय, ‘हॉपिंग फ्लाइट’द्वारे नाशिक देशातील प्रमुख महानगरांना जोडण्याचा पर्याय आहे. ओझर विमानतळ कार्यरत होण्यासाठी मुंबईची ३० टक्के कार्गोसेवा ओझरला दिली जावी असाही प्रयत्न केला जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा कृषीमाल देशभरात पाठविता यावा यासाठी टर्मिनल मार्केटला सैय्यद पिंप्री शिवारात जागा देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या घडामोडी घडत असल्या तरी नाशिकहून मुंबई अथवा पुणे वा अन्य कोणत्याही शहरात थेट विमान सेवा उपलब्ध होईल याची शक्यता मावळली आहे.