साईभक्तांसाठी चेन्नई ते नगरसूल ही साप्ताहिक रेल्वे दि. १ जुलैपासून सुरु होणार आहे. तसेच सोलापूर ते जयपुर या रेल्वे गाडीला एक वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रयत्नाने चेन्नई नगरसूल रेल्वे सुरु करण्यात येणार असून चेन्नई, रेणीगुंठा, औरंगाबाद, काचीगुडा मार्गे नगरसूल असा गाडीचा मार्ग असेल. या रेल्वेगाडीमुळे नगर जिल्ह्यातील तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांचीही सोय होणार आहे. भविष्यात ही रेल्वे साईनगपर्यंत आणण्यात येईल, असे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी सांगितले.
रेल्वेचे नवे वेळापत्रक दि. १ जुलैपासून सुरु होत आहे. साईनगर ते कालका एक्सप्रेस आठवडय़ातून दोन वेळा भोपाळ इटारसी मार्गे दिल्लीला जाणार आहे. साईनगर ते पुरी साप्ताहिक रेल्वे नागपूर, रामपूर मार्गे सुरु होणार आहे. नगरसूल ते नरसापूर एक्सप्रेस दररोज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस आठवडय़ातून दोन वेळा धावत होती. आता ती चार वेळा धावणार आहे. खासदार वाकचौरे यांच्या प्रयत्नाने रेल्वेचे प्रश्न सुटण्यास फार मोठी मदत होत आहे, असे श्रीगोड म्हणाले.