आधुनिक काळात वावरताना माणसावरचा जातींचा पगडा जरी कमी झाला असला तरी त्यांच्यावर विचारांचा पगडा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. वैचारिक अस्पृश्यतेच्या आणि बौद्धिक असहिष्णुतेच्या हेतुत: उभ्या केलेल्या िभती समाजस्वास्थ्य बिघडवत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी ठाण्यात आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केले.
भारतीय परंपरा, संस्कृतीचा प्रारंभापासून त्याचा समग्र आढावा घेणाऱ्या दि. वि. असेरकर लिखित ‘युगानुकूल समाज परिवर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन राजदत्त यांच्या हस्ते रविवारी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात झाले. त्यावेळी प्रा. डॉ. अशोक मोडक, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष मा.य.गोखले, ग्रंथाचे संकलक मकरंद मुळे, स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीचे संजीव ब्रम्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजदत्त यांनी बदलत्या समाजाचा उलगडा उपस्थितांसमोर केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज आणि आजच्या पिढीतला समाज यांची तुलना केली असता स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरदेखील समाजातील अस्थिरता कायम आहे. आजुबाजूला जे काही घडते आहे ते आपण सहन करत आहोत. डॉ नरेंद्र दाभोलकरांसारख्या व्यक्तीची हत्या झाल्यावरही समाजातून स्वत:हून प्रतिक्रिया उमटत नाहीत, यावरून आजचा समाज किती संवेदनाहीन झाला आहे याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
सध्याच्या समाजावर असलेला विचारांचा पगडा अधिक गडद बनला आहे. त्यामुळे कोणी डाव्या विचारांचे, कोणी उजव्या तर कोणी आणखी वेगळ्या विचारांचे अशा विविध विचारांच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यात न अडकता अनेकजण सरळ मार्गाने म्हणजेच मानवतावादाने जपण्याचे ठरवतात. परंतु ते विचार आचरणात मात्र आणत नाही, अशी खंत यावेळी राजदत्त यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा. डॉ. अशोक मोडक यांनी प्रकाशित झालेल्या ग्रंथाचे विश्लेषण केले. ग्रंथाची बलस्थाने, विविध विचारधारांचा मागोवा घेत ग्रंथामध्ये करण्यात आलेल्या विवेचनाची आवश्यकता मोडक यांनी व्यक्त केली. परिवर्तनाची दिशा सर्वसमावेशक आणि गतिमान करण्यासाठी भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांची योग्य सांगड घातली पाहिजे असेदेखील मोडक म्हणाले.