परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच घेतल्याप्रकरणी एका निदेशकास तर एका शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी एका तलाठय़ास भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले. लाच मागितल्याप्रकरणी मंडळ अधिकारी सुधाकर राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अरुण महादेव सुटे हे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मौदा येथील तहसीलदार कार्यालयात तलाठी आहे. तक्रारदार सुनील शेषराव माटे (रा. धामणगाव, मौदा) यांची शेती आहे. त्यांच्या शेतात खोदण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टर आणले होते. जेसीबीने माती खोदून ट्रॅक्टरमधून घरकामासाठी नेत असतानामंडल अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अरुण महादेव सुटे तेथे आले. शेतातून माती खोदण्याची परवानगी घेतली नाही, असे म्हणत त्यांनी आक्षेप घेतला. जेसीबी व ट्रॅक्टर जप्त केले जाईल आणि विनापरवानगी माती खोदल्याबद्दल ४८ हजार रुपये दंड वसूल केले जाईल. ते न करण्यासाठी पंधरा हजार रुपये रक्कम मागून ८ तारखेला त्याने बोलावले.
ते देण्याची इच्छा नसल्याने सुनील माटे यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक प्रकाश जाधव यांची भेट घेऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, निरीक्षक किशोर पर्वते व जीवन भातकुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सकाळी मौदा तहसीलदार कार्यालयात सापळा रचला.
तेथे सुनील माटे यांना मंडल अधिकारी सुधाकर राठोड व तलाठी अरुण महादेव सुटे यांनी पंधरा हजार रुपये मागितले. एवढे सध्या नाहीत १२ हजार ५०० रुपये आहेत, अशी तडजोड मान्य करून तलाठी अरुण सुटे याने १२ हजार ५०० रुपये स्वीकारल्यानंतर त्याला पकडले. लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी सुधाकर राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  
निदेशक अटकेत
एका विद्यार्थ्यांकडून उत्तीर्ण करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी प्रशांत राम येळणे (रा. उल्हासनगर, मानेवाडा रोड) हे आरोपीचे नाव असून तो रामटेकच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात ऑटोमोबाईल विषयाचा निदेशक आहे. शुभम महेंद्र साव हा बारावीत शिकतो. २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात त्याने प्रात्यक्षिक परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी काही गुण आवश्यक होते. ते देऊन उत्तीर्ण करून देण्यासाठी आरोपी प्रशांत येळणे याने एक हजार रुपयांची मागणी केली व ८ तारखेला बोलावले. ते देण्याची इच्छा नसल्याने शुभमने त्याच्या पालकांमार्फत भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक प्रकाश जाधव यांची भेट घेऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक वासुदेव डाबरे व पुरुषोत्तम बावनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सकाळी महाविद्यालयात सापळा रचला. शुभमकडून एक हजार रुपये स्वीकारल्यानंतर आरोपी प्रशांतला पकडण्यात आले.