एखाद्या तरुणाला अपंग स्वरूपात बघितल्यास त्याच्या घरच्यांना दुख होते. अपंगांसाठी असलेले महागडे साहित्य खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. अशांना मदत करणे हे सर्वात मोठे कार्य आहे. असे  केल्याने एखाद्याचे जीवन सुधारत असेल तर त्यातच खरा आनंद आहे. शिबिराच्या माध्यमातून कित्येकांना आधार मिळणार असून हे शिबीर सर्वाच्या मनाला स्पर्श करणारे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.
निमित्त होते अपंगांसाठी साहित्य वाटप करण्यासाठी आयोजित निवड शिबिराचे. मनोहरभाई पटेल अकादमी आणि दिशा संस्थेच्या सहकार्याने, तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम, कानपूर या संस्थेच्या वतीने आयोजित या शिबिराचे उद्घाटन  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते दिवं. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी मंचावर आमदार राजेंद्र जैन, कानपूर येथील संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक नारायण राव, संजय सिंग, आर.आर. माथूर, दिशा संस्थाचे डॉ.देवाशिष चटर्जी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव मेश्राम, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवसुदन धारगावे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
येथील श्रीजी लॉनच्या प्रांगणात आयोजित या शिबिरात दोन दिवसात १३०० पेक्षा जास्त अपंग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. विविध कारणांनी अपंगत्व आलेल्या आíथक कमकुवत सर्व वयोगटातील व्यक्तींना निशुल्क साहित्य वाटप करण्यासाठी त्यांची या शिबिरातून निवड करण्यात आली. त्यासाठी जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणेच्या डॉक्टरांनी आपले योगदान दिले.
विविध प्रकारच्या अपंगत्वाने ग्रासलेल्या जिल्हाभरातील रुग्णांनी शिबिराचे स्थळ पूर्णपणे व्यापून टाकले होते. तेथील वातावरण पाहून भारावून गेलेले प्रफुल्ल पटेल म्हणाले, मनोहरभाई पटेल अकादमीकडून आम्ही अनेक प्रकारची शिबिरे घेत असतो. परंतु, या शिबिरामुळे मिळणारे समाधान वेगळेच आहे. हे शिबीर पहिले आणि शेवटचे नाही. अपंग नागरिकांची संख्या पाहता प्रत्येकाला याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. या शिबिरातून ज्यांना साहित्य मिळणार त्यांच्या साहित्यात काही बिघाड किंवा समस्या असल्यास ते पुढील शिबिरात दुरुस्त करून दिले जाईल. तसेच या शिबिरात राहून गेलेल्या लाभार्थीना पुढील शिबिरात संधी मिळेल.
या शिबिरात मोफत साहित्य मिळविण्यासाठी लाभार्थी बीपीएल कुटुंबातील असायला पाहिजे. मात्र, आपण ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड नाही त्यांच्यासाठी अट थोडी शिथील केली आणि सरपंचांकडून मासिक उत्पन्न ६,५०० रुपयांपेक्षा जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दाखल आणणाऱ्यांनाही या शिबिराचा लाभ दिल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. गेल्या वर्षी मिर्गीग्रस्तांसाठी असेच शिबीर घेतले होते. त्यात ६०० लोकांनी लाभ घेतला. मेडिकल कॉलेजलाही जिल्ह्यात पुढील वर्षी सुरुवात होणार असून येणाऱ्या काळात जिल्हा आरोग्य सुविधांच्या बाबतीत परिपूर्ण होईल, अशी ग्वाही पटेल यांनी दिली. यावेळी आममदार राजेंद्र जैन, नारायण राव, डॉ.चटर्जी यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार ललित जीवानी यांनी मानले.