विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या अपंगांच्या मोर्चाला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही न्याय मिळाला नसल्याने आक्रमक झालेल्या अपंगांना अखेर यावर्षीही निराश मनाने परतावे लागले.
दृष्टीहीन आणि अपंगांच्या विविध मागण्यांबाबत शासनाने चर्चा करून त्या सोडवाव्या, अशी मागणी करीत विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी यशवंत स्टेडियमवरून काढण्यात आलेला मोर्चा टेकडी मार्गावर अडविण्यात आला. मोर्चातील अपंग न्याय मागण्यांसाठी सरकारकडे याचना करीत असताना गेल्या अकरा दिवसात पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अपंग विभागातील अधिकारी त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मोर्चासमोर आले, मात्र त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली. अपंगांना लेखी हवे असताना प्रशासकीय पातळीवर ते शक्य नसल्याने अधिकारी अपंगांसमोर हतबल झाले होते. दोन्ही मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासावर अपंगांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्याशिवाय हटायचे नाही, असा पवित्रा घेतला.
गिरधर भजभुजे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ते वीस अपंग मोर्चास्थळी बसले होते. यात त्यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. अनेक अपंग आपल्या घरी गेले नाही. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी अपंगांना आश्वासन दिले, मात्र पोलिसांवर विश्वास न ठेवत सर्व अपंग टेकडी मार्गावर ठाण मांडून बसले होते. अकरा दिवस न्याय मागण्यांची प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येताच अपंगांनी सकाळपासून मोर्चास्थळी गोंधळ घालणे सुरू केले. मोर्चामध्ये २० ते २५ अपंग असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी १०० ते १२५ पोलीस होते. अपंग आक्रमक होत असताना बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले कठडे ते उचलून बाजूला फेकत होते. अपंग कल्याण मंडळाचे सुहास काळे यांनी अपंगांना मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे लेखी दिले, त्यानंतरही अपंग तेथून हटले नाही. अखेर पोलीस अपंगांना ताब्यात घेत असताना आंदोलन बंद करून अपंगांनी घरी परण्याचा निर्णय घेतला.